कसे लढतायेत लंडनकर कोरोनाशी...वाचा

E
E

लंडनमध्ये आता कोरोना साथीचा उतार सुरु झाला आहे. 1 लाख 63 हजार लोकसंख्येच्या या शहरात आत्तापर्यंत 541 कोरोना रुग्ण आढळले असून त्यापैकी जवळपास 116 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यातले 33 टक्के मृत्यू 29 फेब्रुवारी ते 1 मे दरम्यानचे आहेत. आजही देशात सरासरी रोज दोनशे जणांचा मृत्यू होतोय. मात्र साथीची भिती बऱ्यापैकी कमी झाली आहे. येत्या महिनाभरात साथ पुर्ण नियंत्रणाखाली येऊन जनजीवन हळू हळू पुर्वपदावर येईल अशी आशा आहे. एक निश्‍चित की या संकटाच्या प्रसंगातही लंडनवासियांनी संयम, धैर्याचे घडवलेले दर्शन ब्रिटीशांच्या परंपरेप्रमाणेच आहे. 

2007 पासून मी लंडनमध्ये आहे. मात्र आत्ताचे शहर प्रथमच अनुभवतेय. अशी भितीची छाया कधीही नव्हती. मात्र या परस्थितीतही समाज म्हणून हे शहर धैर्य-संयमाने परिस्थितीशी सामना करतेय. याचे बहुतांशी श्रेय इथल्या लोकांना जसे आहे तसेच इथल्या प्रशासकीय व्यवस्थेला आहे. 23 मार्चला इथे टाळेबंदी सुरु झाली. मात्र या संपुर्ण काळातही बस-रेल्वे सुरुच आहेत. आजिबात गर्दी न करता अत्यावश्‍यक सेवेतील लोकच प्रवास करतात. बहुतांशी जणांचे घरातूनच काम सुरु आहे. दिवसातून दोनवेळा साहित्य खरेदीसाठी बाहेर जाता येते. आता दोन दिवसात त्यात आणखी सवलत मिळणार आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात इथे मोठा उद्रेक झाला. मात्र तेव्हाही लोकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवले. आता कोरोनासोबत जगण्याच्या दिशेने यंत्रणा काम करतेय. त्याचाच एक भाग म्हणून शहरात दहा हजार रुग्ण क्षमतेची चार हॉस्पिटल्स सज्ज आहेत. 
या काळात छोटी छोटी कामे करणाऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यांच्यासाठी शासनाने फुड बॅंक सुरु केल्या आहेत. एनजीओ त्यांना अन्नपदार्थ, साहित्य पुरवत आहेत. आम्हा नोकरदारांना कंपन्याकडून मिळणाऱ्या पगारात सुमारे ऐंशी टक्के वाटा सरकार उचलतेय. करदात्यांच्या मदतीसाठी यावेळी शासन पुर्ण ताकदीने उभे आहे. 
आता शाळांही पुढील महिन्यात सुरु होतील असे वाटते. सध्या ऑनलाईन एज्युकेशन सुरु आहे. मात्र छोट्या मुलांना संगणकासमोर बसवून ठेवणे हेच दिव्य आहे. हे शिक्षण परिपूर्ण नाही मात्र त्याचा सध्याच्या संकटकाळात आधार मिळतोय. मुलं शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यासोबत पालकांचीही कसोटी लागतेय. 
इथल्या भारतीय खाद्यपदार्थांच्या दुकानांनी सध्या घरपोहच सेवा सुरु केली आहे. ही दुकाने एरवी तशी सेवा देत नाही. ही सर्वात दिलासा देणारी गोष्ट आहे. इथल्या भारतीयांना घरीच स्वयंपाक करायची सवय आहे मात्र ब्रिटीशांना ती नसल्याने त्यांची खूप मोठी अडचण झाली आहे. लंडन तसे पर्यंटन केंद्रच आहे. त्यामुळे छोट्या छोट्या व्यावसायिकांचे खूप हाल सुरु आहेत. त्यांच्यासाठीही शासन मदत करीत आहे मात्र ते सर्वाधिक अडचणीत आहेत हे नाकारता येणार नाही. 
कालच पंतप्रधानांचे प्रेरणादायी भाषण झाले. त्यांच्या दिलासा देणाऱ्या शब्दांनी आपण यातून लवकरच बाहेर पडू असे वाटतेय. रोज संध्याकाळी चार ते सहा या वेळेत बीबीसीवर कोरोनाची देशभरातील स्थिती मांडली जाते. जबाबदार अधिकारी-मंत्री ब्रिफींग करतात. त्यातून लोकांसमोर स्पष्ट असे चित्र उभे राहते. लॉकडाऊनच्या काळात इथल्या टीव्ही चॅनेल्सनी अतिशय जबाबदारीने वृत्तांकन केले. लोकांना योग्य माहिती देतानाच त्यांनी घडवलेली चर्चासत्रे-कार्यक्रम उपयुक्त असे होते. 
सध्या पंधरा डिग्री तापमान आहे. पुढील महिन्यात आणखी वाढणार आहे. मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र तरीही सर्वकाही सुरळीत व्हायला डिसेंबर उजाडेल असे दिसते. 

(शब्दांकन ः जयसिंग कुंभार) 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com