गुटख्यासाठी नामी शकल्ल...  कांदा गोणीखाली लपविला... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 एप्रिल 2020

लॉक डाउनमुळे सर्वकाही बंद असून, केवळ जिवनावश्‍यक वस्तूंची विक्री होत आहे. त्यासाठी अधिकृतरीत्या पास दिले जातात. जिवनावश्‍यक वस्तूंसाठीचा पास घेऊन गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने काल नगरमध्ये पकडला. 

नगर : अत्यावश्‍यक सेवाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडला. दोघांना ताब्यात घेत सुमारे पाच लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सलीम युसूफ शेख (रा. भातरनगर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), संतोष अशोक शिंदे (रा. वाळूंज, ता. गंगापूर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. 

हेही वाचा दरोडेखोरांच्या टोळीकडून शस्त्रास्त्रे जप्त 

सोलापूर रस्त्याने अत्यावश्‍यक सेवा असा फलक लावलेला टेम्पोमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून सोलापूर रस्त्यावर दरेवाडी शिवारात कॅन्टोमेंट नाक्‍यावर टेम्पो अडविला. त्या टेम्पोमध्ये सलीम शेख व संतोष शिंदे असे दोघेजण आढळून आले. टेम्पोच्या हौदामध्ये 20 कांदा गोण्या आणि त्याखाली पानमसाला गुटखा, तंबाखूचे पोते आढळले. पोलिसांनी वरील दोघांना ताब्यात घेऊन टेम्पोसह पाच लाख 42 हजार 256 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुटाख व पानमसाला कोणाच्या मालकीचा आहे. याबाबत विचारणा केली असता वरील दोघांनी सचिन म्हस्के (रा. वाळूंज, ता. गंगापूर) असे नाव सांगितले. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस नाईक संतोष लोंढे, रवींद्र कर्डिले, रोहीत मिसाळ, प्रकाश वाघ, राहुल सोळंके यांच्या पथकाने केली. 

हेही वाचा रोज आम्हा युद्धाचा प्रसंग... सख्खे भाऊ लढताहेत कोरोनाविरुद्ध 

संचारबंदीत गुटख्याला मोल 
लॉक डाउनच्या काळात गुटख्याला चांगलाचा भाव मिळत आहे. त्यामुळे गुटख्याची काळ्या बाजारातून वाहतूक आणि विक्री होत आहे. दहा रुपयांच्या माव्यासाठी आता चाळीस रुपये मोजावे लागत असल्याने गुटख्याला मोलाचे दिवस आले असल्याचे समजते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal gutkha transport, both caught