मुख्यमंत्री भेटीबाबत इंदोरीकर महाराजांनी केला खुलासा, म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

संगमनेर तालुक्याचे नेतृत्व खूप सुसंस्कृत आणि विकासात्मक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी मी स्वतः समाजासाठी करत आलो आहे.​

नगर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर उपस्थिती लावल्याने ते राजकारणात उडी मारणार काय? या चर्चेला राजकीय वर्तुळात तोंड फुटले. भाजप त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार असल्याच्या चर्चा तेव्हापासूनच जोर धरू लागल्या. 

- इंदुरीकर महाराजांचे राजकीय 'कीर्तन'; थोरातांना शह देण्यासाठी भाजपचा डाव

या चर्चेचे लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरल्यानंतर खुद्द इंदोरीकर महाराजांनीच त्यावर खुलासा दिला आहे. या खुलाशामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ''काल संगमनेर तालुक्यातील महाजनादेश यात्रेमध्ये मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी गेलो नव्हतो. समाजासाठी माझं काहीतरी देणं लागतं आणि माझ्या व्यस्त कार्यक्रमांच्या दैनंदिन जीवनात मला समाजासाठी जी काही मदत करायची असते ती करता येत नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांना मी स्वतः एक लाख रुपयांचा धनादेश 'मुख्यमंत्री सहायता निधी'साठी सुपूर्द करण्यासाठी संगमनेर येथे गेलो होतो.

कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू मी मनामध्ये ठेवलेला नव्हता. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी तो एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. यावेळी कुठल्याही पक्षाचा मफलर गळ्यात न घालता तिथून कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी निघून गेलो. जर मला राजकारणात किंवा निवडणुकीत उतरायचे असते, तर मी संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत तिथेच थांबून राहिलो असतो; परंतु मी मात्र समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे.''

- Video : राष्ट्रवादीत 15 वर्षांत फक्त अडवा आणि जिरवा : उदयनराजे

इंदोरीकर पुढे म्हणाले, ''राजकारणात मी कधीही येणार नाही आणि संगमनेर तालुक्याचे नेतृत्व खूप सुसंस्कृत आणि विकासात्मक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी मी स्वतः समाजासाठी करत आलो आहे. माझ्या स्वतःच्या शाळेसाठी स्व. भाऊसाहेब थोरात यांनीच पहिली वर्गणी दिलेली आहे आणि आजदेखील आमदार बाळासाहेब थोरात हे शाळेला नेहमी मदत करत असतात. मी कधीही या गोष्टीचा विसर पडू देणार नाही. मी सर्व माझ्या हितचिंतकांना व श्रोत्यांना सांगू इच्छितो की, मी कधीही राजकारणात येणार नाही. समाजकार्याचा वसा मी हाती घेतलेला आहे तो माझ्याकडून निरंतर सुरू राहील. त्यामुळे माझ्या संगमनेर विधानसभा उमेदवारीच्या काही बातम्या सुरू आहेत, त्यांना मी आजच पूर्णविराम देतो आहे.''

इंदोरीकर महाराजांच्या या खुलाशाने सर्वच चर्चांना पूर्णविराम मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे वृत्त खरे असल्याचे ट्विट केले आहे.

- साताऱ्यात उदयनराजेंविरोधात आघाडी उतरवणार तगडा उमेदवार!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indorekar Maharaj reveals about CMs visit