#worldhandicappedday : दिव्यांग संजय जिद्दीतून 'क्‍लास टू ऑफिसर' 

परशुराम कोकणे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असताना तत्कालीन सहायक लेखाधिकारी एम. एम. केदार यांनी मला प्रोत्साहन दिले. कार्यालयीन कामासोबतच अभ्यासाकडे लक्ष देऊन 2018 मध्ये सहायक लेखाधिकारी पदासाठी एमपीएससीची परीक्षा दिली. नुकताच परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. जिद्दीतून माणसाला कोणतेही यश मिळविता येते. यशासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. 
- संजय कोंढारे, 
सहायक लेखाधिकारी

सोलापूर : पोलिस आयुक्तालयात कनिष्ठ श्रेणी लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या संजय कोंढारे यांनी जिद्दीतून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन सहायक लेखाधिकारी पदाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. जन्मजात दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले संजय हे आता क्‍लास टू ऑफिसर झाले आहेत, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. आजच्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ही स्टोरी.. 

मूळचे चिखर्डे (ता. बार्शी) येथील संजय यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शारीरिक अपंगत्वावर मात करून बीकॉमपर्यंतचे शिक्षण घेतले. आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी रोज चिखर्डे ते बार्शी एसटीने प्रवास करून त्यांनी बार्शीत कॉम्प्युटर क्‍लास चालवला. गावातील दहावीच्या विद्यार्थ्यांची शिकवणीही घेतली. स्वतः डीएडही केले. अनेकांना संगणक साक्षर करून संजय हेसुद्धा पदवीधर झाले. 

हेही वाचा : शरीराचा नसला तरी मनाचा पाय भक्कम

एवढ्यावरच न थांबता संजय यांनी पोलिस खात्यातील लिपिक पदावर नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. 2011 मध्ये ते कनिष्ठ श्रेणी लिपिक म्हणून शासकीय सेवेत आले. सुरवातीला ग्रामीण पोलिस दलात सेवा केली. गेल्या वर्षभरापासून संजय हे पोलिस आयुक्तालयात कार्यरत आहेत. दरम्यान, संजय यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या खात्यांतर्गत विभागीय परीक्षेचा अभ्यास करून सहायक लेखाधिकारी पदाची परीक्षा दिली.

हेही वाचा : जगण्याच्या आभाळात ऊर्मीचं चांदणं..

या परीक्षेत महाराष्ट्रातून 52 उमेदवार पात्र ठरले. त्यात दिव्यांग असलेल्या संजय यांचे यश प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशाबद्दल पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त वैशाली कडुकर यांनी सन्मान करून शुभेच्छा दिल्या आहेत. "मी दिव्यांग आहे म्हणून कामावर काहीच परिणाम होत नाही. उलट धडधाकट व्यक्तीपेक्षा मी अधिक क्षमतेने काम करू शकतो' असा विश्‍वास संजय यांनी व्यक्त केला आहे. आई कालिंदा, वडील नामदेव हे आजही गावाकडे शेती करतात. त्यांच्यासह मोठा भाऊ सोपान, लहान बहीण मनीषा यांच्या आशीर्वाद, प्रोत्साहनामुळे हे यश मिळविता आल्याचेही संजय यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational Story by Sanjay Kondhare