गडहिंग्लजला तालुका अध्यक्षपदावरून ‘राष्ट्रवादी’त मतभेद?

अजित माद्याळे
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

तेली जिल्हा कार्यकारिणीवर

शिवप्रसाद तेली यांना जिल्हा कार्यकारिणीवर चांगली संधी देणार आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा विषय येथे येत नाही. त्यांना यापुढे जिल्हा स्तरावर काम करावे लागणार असल्याने तालुका अध्यक्षपदावर बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती केली आहे.
- ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी.

गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - एकीकडे राज्याच्या सत्ता स्थापनेत राष्ट्रवादी किंगमेकर ठरत असतानाच गडहिंग्लज तालुक्‍याच्या राष्ट्रवादीत मात्र तालुका अध्यक्षपदाच्या निवडीतील  मतभेद चव्हाट्यावर येत असल्याचे चित्र आहे. निवडणूक निकालानंतर शिवप्रसाद तेली यांना अध्यक्षपद जाहीर केले होते. त्यांच्या अभिनंदनाचे डिजिटल फलक उतरण्यापूर्वीच आता याच जागेवर मुगळीच्या बाबासाहेब पाटील यांची निवड केली आहे. अवघ्या पंधरावड्यातच झालेल्या या वेगवान बदलावर प्रतिक्रिया देताना तेली यांच्याकडून अजूनही मीच अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आल्याने मतभेद उघड झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी चंदगड मतदारसंघाच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष बी. एन. पाटील-मुगळीकर यांचे निधन झाले. त्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवर तालुकाध्यक्षपदी कार्यरत असलेले भडगावचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामाप्पा करिगार यांना संधी देण्यात आली. यामुळे तालुकाध्यक्षांच्या रिक्त जागेवर हसूरचंपूच्या शिवप्रसाद तेली यांची निवड करण्यात आली. त्यांची निवड जाहीर होताच राष्ट्रवादीतीलच दुसऱ्या एका गटात अस्वस्थता दिसू लागली. दरम्यान, तेलींच्या निवडीवरून गेल्याच आठवड्यात शासकीय विश्रामगृहावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकही झाल्याची चर्चा आहे. त्यावेळी तेली समर्थक व विरोधी नाराज गटात जोरदार शाब्दीक चकमकी झडल्याचे बोलले जाते.

तेली राष्ट्रवादीतच कार्यरत

गेल्या पंचायत समिती निवडणुकीत तेली यांच्या चुलत भावजय प्रा. जयश्री तेली यांनी भाजपची उमेदवारी घेऊन विजयी झाल्या. त्यावेळी तेली यांनी भाजपचे काम केल्याचा आक्षेप घेऊन त्यांच्यामुळे बड्याचीवाडी जि. प. मतदारसंघात राष्ट्रवादीची पिछेहाट झाल्याची तक्रार यापूर्वी पक्षनेतृत्वाच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबंधित पराभूत उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चा आहे. याच तक्रारीची उजळणी विश्रामगृहावरील बैठकीतही झाल्याचे सांगण्यात येते. ही पार्श्‍वभूमी असली तरीसुद्धा तेली राष्ट्रवादीतच कार्यरत आहेत.

तेली जिल्हा कार्यकारिणीवर

शिवप्रसाद तेली यांना जिल्हा कार्यकारिणीवर चांगली संधी देणार आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा विषय येथे येत नाही. त्यांना यापुढे जिल्हा स्तरावर काम करावे लागणार असल्याने तालुका अध्यक्षपदावर बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती केली आहे.
- ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी.

नाराजीमुळेच हालचाली

तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संध्यादेवी कुपेकर यांनी न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर झालेल्या घडामोडीतही तेली यांचा पुढाकार होता. दरम्यान, तेली यांची अध्यक्षपदावर निवड होताच पक्षातीलच त्यांच्या विरोधातील नाराज गटात वेगवान हालचाली सुरू झाल्या. या हालचालींची परिणीती म्हणूनच या पदावर मुगळीच्या पाटील यांची निवड झाल्याचे सांगण्यात येते. आता या मतभेदावर संध्यादेवी कुपेकर, आमदार राजेश पाटील, जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मार्ग काढून मतभेद संपुष्टात आणणार का?, याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

तेली समर्थकांचा सामूहिक राजीनामा ?
तालुका अध्यक्ष बदलाच्या घडामोडीमुळे तेली समर्थकांत नाराजी आहे. यातील काही समर्थक जिल्हा कार्यकारिणीवर कार्यरत आहेत. अध्यक्षपद बदलाच्या पार्श्‍वभूमीवर ते सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. हा त्यांचा पवित्रा कायम राहणार की नेते त्यांचे वादळ थोपविणार, याचीही उत्सुकता आहे. 

मीच तालुकाध्यक्ष

तालुकाध्यक्ष बदलाची मला पक्षाकडून कोणतीही कल्पना दिलेली नाही. साधा फोनसुद्धा केलेला नाही. मी राजीनामाही दिलेला नाही. यामुळे तालुका अध्यक्षपदावर अजूनही मीच कायम आहे.
- शिवप्रसाद तेली, हसूरचंपू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Issue Of NCP Gadhinglaj Taluka President