सोलापुरात हेल्मेट न वापरणाऱ्यांना दणका

तात्या लांडगे
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

- आरटीओ व शहर वाहतूक पोलिसांची संयुक्‍त कारवाई 
- शुक्रवारी एका दिवसात दोन लाखांचा दंड वसूल 
- तब्बल 629 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई 
- नोव्हेंबरमध्ये तीन हजार वाहनचालकांचा परवाना निलंबित

सोलापूर : शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांतील दुचाकीवरून येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याची सूचना करूनही अनेकजण विनाहेल्मेट दुचाकी चालवतात. दुसरीकडे शहरातील वाहनचालकही वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याने शहर वाहतूक पोलिस व आरटीओ यांच्यावतीने कारवाईची संयुक्‍त मोहीम राबविली जात आहे. शुक्रवारी (ता. 22) एका दिवसात तब्बल 629 बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचा दंड वसूल करण्यात आला. 
सोलापूर शहरातील अपघात रोखण्यासाठी पोलिस आयुक्‍तांनी जड वाहतूक दिवसा (शहरांतर्गत चार वाजेपर्यंत तर परगावी जाणाऱ्यांना रात्री नऊनंतर परवानगी) बंद केली. तरीही दरमहा सरासरी 60 अपघात अन्‌ सात जणांचा मृत्यू हे प्रमाण सुरूच आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आता आरटीओ व शहर वाहतूक पोलिसांनी संयुक्‍तपणे कारवाईला सुरवात केली आहे. त्यानुसार आरटीओने 1 ते 22 नोव्हेंबरपर्यंत तीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून सात लाखांचा दंड वसूल केला आहे. आता या वाहनचालकांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबन करण्याच्या उद्देशाने प्रस्ताव मागविण्यात आल्याचेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. तत्पूर्वी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बहुतांश सरकारी कार्यालयातील कर्मचारी शुक्रवारी (ता. 22) हेल्मेट घालून कामावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

शाळा, महाविद्यालये कारवाईच्या रडारवर 
शाळेत मुलांना सोडविण्यासाठी येणारे पालक व शिक्षकांकडूनही वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालवत असल्याचे निदर्शनास आले असून काही महिन्यांपूर्वी त्याबाबत त्यांना सूचनाही केल्या आहेत. दुसरीकडे महाविद्यालयांमध्ये जाताना अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींकडेही दुचाकी आहेत मात्र, हेल्मेट वापरत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर आता शाळा, महाविद्यालयांबाहेर कारवाई केली जाणार आहे. 

जिल्हाधिकाऱयांचा असाही हिसका, दुचाकीस्वारांनी घेतला त्याचा धसका

आता थेट परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित 
बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू असतानाही अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे 1 ते 22 नोव्हेंबरपर्यंत कारवाई करण्यात आलेल्या तीन हजार वाहनचालकांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाणार आहेत. तर यापुढेही हेल्मेट न घालणे, मद्यपान करून वाहन चालवणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी अथवा माल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यातच त्यांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाणार असल्याचा इशारा शहर वाहतूक पोलिस शाखा व आरटीओकडून देण्यात आला आहे. 

...दंड वसुलीसाठी नव्हे तर स्वयंशिस्तीसाठीच कारवाई 
अपघात होऊ नये अथवा अपघातानंतर जीव गमावावा लागू नये म्हणून शहर असो की जिल्ह्यातील दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे आवश्‍यक आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी (ता. 21) रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत हेल्मेट कारवाईचे निर्देश दिले. आरटीओ व शहर वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्‍तीची कारवाई सुरू आहे मात्र, ती दंड वसुलीसाठी नाही तर स्वयंशिस्तीसाठी आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी स्पष्ट केले. जोवर दुचाकीस्वार हेल्मेट घालणार नाहीत तोवर कारवाई सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. 

ठळक बाबी... 
- शहरातील नऊ पोलिस ठाणे परिसरात आरटीओ उभारणार सेल्फी पॉइंट 
- 1 ते 22 नोव्हेंबरपर्यंत शहरातील तीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर केली कारवाई 
- महिन्यात बेशिस्त वाहनचालकांकडून सात लाखांचा दंड वसूल : आता परवाने निलंबनाची कारवाई 
- हेल्मेट सक्‍तीच्या कारवाईसाठी चार मोटार वाहन निरीक्षक अन्‌ आठ सहायक वाहन निरीक्षकांची नियुक्‍ती 
- नोव्हेंबरच्या 22 दिवसांत दररोज सरासरी 150 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई 
- आरटीओ अन्‌ शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने संयुक्‍त कारवाईची मोहीम 
- 22 नोव्हेंबरला (शुक्रवारी) सुमारे 400 बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई 
 
नोव्हेंबर महिन्यात सुमारे तीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक नियम उल्लंघनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे सात लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून आता त्यांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मागविण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी हेल्मेट घालून आल्याचे दिसून आले. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is it compulsory to wear helmet in solapur