भलगडी दादा भलरी, व्हय गड्या... 

jawar harvest work in progress in Karjat taluka
jawar harvest work in progress in Karjat taluka

कर्जत : "भलगडी दादा भलरी, व्हय गड्या, दादा भलरी..' अशा गीतांच्या तालावर सध्या कर्जत तालुक्‍यात ज्वारीच्या काढणीला वेग आला आहे. पावसाने दोन वर्षांनंतर साथ दिल्याने यंदा सुगीचे दिवस आहेत. शिवारात भलरीचा आवाज घुमत आहे. शेतशिवार शेतकरी, मजुरांनी फुलला आहे. 

गेल्या वर्षी दुष्काळी स्थितीमुळे ज्वारीची पेरणी झाली नव्हती. या वर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना चांगला दिलासा दिला. रब्बी हंगामातील ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. "कुकडी' आणि "सीना'चे आवर्तन अगदी वेळेवर आल्याने पिकांना संजीवनी मिळाली. सध्या ज्वारीच्या काढणीला सुरवात झाली आहे. एकाच वेळी ज्वारी काढायला आल्याने मजुरांची टंचाई जाणवत आहे. मजूर कमी व ज्वारीचे क्षेत्र जास्त झाल्याने रोजंदारीचीही चढाओढ सुरू झाली आहे. ज्वारीच्या काढणीस उशीर झाला तर पानगळ होऊन ज्वारी काढता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ज्वारी काढण्यासाठी चढाओढ लागली आहे. 

पुन्हा "इर्जिक' जोरात... 

हलगी, डफडे, पिपाणीच्या तालावर ज्वारीची काढणी सुरू आहे. अनेक ठिकाणी मांसाहारी व शाकाहारी जेवणाच्या पंगतींसह "इर्जिक' (सामूहिक शेती) जोरात सुरू आहे. 

चाऱ्याची अडचण नाही

पुरुषाला 500 ते 600, तर महिलांना 250 ते 300 रुपये मजुरी झाली आहे. असे असले, तरी शेतकरीराजा मात्र वर्षाची सालचंदी गोळा करण्यासाठी आनंदाने सुगी करीत आहे. या वर्षी ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सालचंदीचा प्रश्न मिटून आर्थिक हातभारही लागणार आहे. त्यामुळे या वर्षी जनावरांचा चारा व ज्वारीही मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. 
- नीलेश शेवाळे, प्रयोगशील शेतकरी, पाटेगाव 

ज्वारीला हमीभाव मिळावा

मजुरी वाढल्याने ज्वारीच्या काढणीचा खर्च वाढला आहे. ज्वारीला चार ते पाच हजार रुपये बाजारभाव मिळाला, तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. अन्य पिकांप्रमाणेच ज्वारीला शासकीय हमीभाव मिळावा. 
- भैरवनाथ शेटे, सरपंच, जळगाव चौफुला 

ज्वारीचे तालुक्‍यातील मंडलनिहाय क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 

कर्जत 13484
राशीन 6479 
भांबोरे 6372
कोंभळी 10771
मिरजगाव 5006
माही 11383

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com