भाजपची सत्ता जनतेच्या भल्यासाठी नव्हती; जयंत पाटलांची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

भाजपची सत्ता जनतेच्या भल्यासाठी नव्हती; जयंत पाटलांची टीका

सांगली : भाजपने महापालिकेची सत्ता मिळविली पण जनतेच्या भल्यासाठी त्यांची सत्ता नव्हती. भाजपच्या सुजाण नगरसेवकांनी साथ दिली. त्यामुळे आघाडीची सत्ता आली. काँग्रेसमुळेच राष्ट्रवादीचा महापौर झाला, हे विसरता येणार नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्व नेते, महापौर व पदाधिकारी लक्ष देतील व कॉंग्रेसचे शिकलगार यांना बहुमताने विजयी करतील, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

महापालिकेच्या प्रभाग १६ च्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार तौफिक शिकलगार यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री जयंत पाटील यांची सभा झाली. यावेळी काँग्रेसचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, गटनेते मैनुद्दीन बागवान, माजी महापौर सुरेश पाटील, प्रदेश संघटक सचिव शेखर माने, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहूल पवार, नगरसेवक मयूर पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा: UP निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, योगींचा मतदारसंघ ठरला

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, हारूण शिकलगार यांनी मदन पाटील यांना कायम साथ दिली. त्यांच्या निधनाने निवडणूक लागली आहे. त्यांचे पुत्र तौफिक या तरुण कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. शिकलगार कुटुंबियांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली आहे. हे लक्षात घेऊन तौफिक यांना जनतेने साथ द्यावी. भाजपला गेल्या निवडणुकीत साथ दिली. पण त्यांचा विकास पाहता काही उपयोग झाला नाही. काँग्रेसच्या तसेच भाजपमधील काही सुजाण नगरसेवकांनी दिग्विजय सुर्यवंशी यांना महापौरपदासाठी निवडून दिले. महापालिकेत आघाडीची सत्ता आल्यापासून नवे उपक्रम राबविले जात आहेत.

विश्वजित कदम म्हणाले, हारूण शिकलगार यांनी २५ वर्षे वॉर्डाचे प्रतिनिधीत्व केले. सर्व जाती धर्माच्या लोकांच्या समस्या सोडविल्या. त्यांच्या निधनाने पोटनिवडणूक लागली. त्यांच्या विचाराचा वारसा असलेले तौफिक शिकलगार यांना उमेदवारी दिली आहे. जातीयवादी शक्ती रोखण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. काहीजण निवडणुकीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला बळी पडू नका. विकासकामे करताना आम्ही राजकारण करत नाही. एकदिलाने काम करतो. महापालिकेत आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे हात बळकट करण्यासाठी तौफिकला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कोरोनाच्या संकटातही पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आजच्या सभेला मोठी गर्दी झाले होती. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

भाजपमुळेच बिनविरोधला खो : जयंत पाटील

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, हारूण शिकलगार यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे तौफिक शिकलगार यांना बिनविरोध करावे, यासाठी प्रयत्न केले होते. पण सतत राजकीय विचार करणार्‍यांमुळे ही निवडणूक बिनविरोध झाली नाही. भावनिक विषयावर कठोर निर्णय घेण्याचे काम जाणीवपुर्वक भाजपकडून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा: पुणे जिल्हा बँकेवर अनुभवी चेहरा, चर्चेतल्या नावांना पवारांचा धक्का?

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांच्यासह शिवसैनिकांनी जयंत पाटील यांना भेटून शिवसेनेचा प्रचार करावा अन्यथा कॉंग्रेसचा प्रचार थांबवा अशी विनंती केली. मात्र श्री. पाटील यांनी ही जागा कॉंग्रेसची आहे. आपण महाआघाडीत असे करायला लागलो तर कसे होणार असे सांगत शिवसैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top