PDCC Bank Election 2022 | पुणे जिल्हा बँकेवर अनुभवी चेहरा, चर्चेतल्या नावांना पवारांचा धक्का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar-Sharad Pawar

पुणे जिल्हा बँकेवर अनुभवी चेहरा, चर्चेतल्या नावांना पवारांचा धक्का?

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी सात जागांची मतमोजणी पार पडली. या सात जागांसाठी १४ उमेदवार नशीब अजमावत होते. अखेर राष्ट्रवादीने बँकेच्या जवळपास सर्व पॅनलवर बाजी मारली. त्यानंतर आज बँकेच्या अध्यक्षपदासाठी घोषणा झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आज पुण्यात दाखल झाले आहेत. (PDCC Bank news)

त्यांच्यात पार पडलेल्या बैठकीनंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुरंदरचे डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी मुळशीचे सुनील चांदेरे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. दुपारी 2 वाजता या नावांची अधिकृत घोषणा होणार आहे. (PDCC Bank Election Results)

एका बाजूला रमेशआप्पा थोरात यांच्यासारखेअजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे शिलेदार असले तरी दुसऱ्या बाजूला बॅंकेच्या निवडणुकीत तब्बल ८५ टक्के मताधिक्याने विजयी झालेले अशोक पवार (Ashok Pawar) हे ही अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. याशिवाय आमदार दिलीप मोहिते आणि वेल्ह्यातून रेवणनाथ दारवटकर यांनाही अध्यक्षपद देण्याची मागणी होत होती. अखेर नव्या नावांची घोषणा झाली आहे. (PDCC Eelection 2022)

जुन्नरमधून प्रत्येक आमदारकीवेळी तडजोड म्हणून बॅंकेत राहणाऱ्या संजय काळेंना (Sanjay Kale) यांचेही नाव आघाडीवर होते. यापूर्वी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष राहिलेले पुरंदरचे प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होणार आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) अध्यक्षपदी पुरंदर तालुक्यातील प्रा. दिंगबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी मुळशी तालुक्यातील सुनील चांदेरे यांच्या नावावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी (ता.१५) शिक्कामोर्तब केले आहे. या दोघांच्या नावनिवडीने पवार यांनी बॅंकेच्या अध्यक्षपदी अनुभवी तर उपाध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रा. दुर्गाडे हे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि मावळत्या संचालक मंडळातही संचालक होते. सुमारे एका दशकाच्या खंडानंतर दुर्गाडे यांना पुन्हा एकदा अध्यक्षपद मिळाले आहे. ते यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ड वर्ग मतदारसंघातून मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत.

दरम्यान, सुनील चांदेरे हे यंदा पहिल्यांदाच मुळशी तालुका अ वर्ग मतदारसंघातून जिल्हा बॅंकेवर निवडून आलेले आहेत. त्यांनी मोठ्या चुरशीच्या निवडणुकीत बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांचा पराभव केला आहे. त्या पराभवाचे बक्षीस म्हणून चांदेरे यांना उपाध्यक्ष पद देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

उपाध्यक्षपदावर नव्या चेहऱ्याला संधी

बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी मावळते अध्यक्ष आणि सर्वात ज्येष्ठ संचालक रमेश थोरात यांच्यासह माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे (पुरंदर), आमदार दिलीप मोहिते (खेड), विकास दांगट (हवेली) आणि बॅंकेचे माजी उपाध्यक्ष संजय काळे (जुन्नर) यांची नावे मागील दोन दिवसांपासून चर्चेत होती. यापैकी दुर्गाडे यांनी बाजी मारली आहे.

बॅंकेच्या उपाध्यक्षपदावर नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दोन दिवसांपूर्वीच देण्यात आले होते. या पदांसाठी पूजा बुट्टे पाटील (जुन्नर), संभाजी होळकर (बारामती) आणि सुनील चांदेरे (मुळशी) यांची नावे चर्चेत होती. त्यात चांदेरे यांनी बाजी मारली आहे.

राष्ट्रवादीचा डंका कायम

पुणे जिल्हा बॅंकेच्या २०२१-२०२६ या पाच वर्षाच्या कार्यकाळासाठीच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी २ जानेवारी २०२२ रोजी निवडणूक झाली होती. ४ जानेवारीला मतमोजणी होऊन, निकाल जाहीर करण्यात आले. संचालक मंडळाच्या २१ पैकी १६ जागा जिंकत, सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा बॅंकेवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. याशिवाय राष्ट्रवादी कॉंगेसचेच असलेले विकास दांगट अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. ते केवळ कागदोपत्री अपक्ष आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PDCC Bank
loading image
go to top