जयंत पाटील यांच्या विरोधात पुन्हा एकदा 'सर्व'; आठजण रिंगणात I Political | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil

सर्वांनी रिंगणात आपली सोंगटी पुढे सरकवली आहे.

जयंत पाटील यांच्या विरोधात पुन्हा एकदा 'सर्व'; आठजण रिंगणात

sakal_logo
By
शांताराम पाटील

इस्लामपूर : जिल्हा बँकेच्या एकूण २२१९ पैकी सुमारे एक चतुर्थांश म्हणजे ५१५ मतदार वाळवे तालुक्यात आहेत. एरवीच्या सर्व निवडणूकांप्रमाणे यावेळीहा जयंत पाटील विरुध्द ‘सर्व’ अशी मांडणी आहे. अर्थात ‘या’ सर्वमध्ये प्रत्येकवेळी बेरीज-वजा होत असते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीला पक्षीय चेहरा नसतो मात्र पारंपरिक विरोधक मात्र वेगवेगळ्या पक्षाच्या रुपात त्यांच्यासमोर असतात. यावेळी महाडीक गटासोबत, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, हुतात्माचे वैभव नायकवडी अशी बेरीज आहे. यावेळी शिवेसेनेचे आनंदराव पवार वजा आहेत.

यावेळी पुन्हा एकदा विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, ॲड. चिमण उर्फ राजेंद्र डांगे (मागील वेळी तज्ज्ञ संचालक होते), माजी आमदार विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव, तर विरोधी भाजप आघाडीतून कामेरीचे सी. बी. पाटील व वाळवा पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक रिंगणात आहेत.याशिवाय बोरगावचे तानाजी पाटील (इतर शेती संस्था गट), इस्लामपूरचे कल्लू कामत (अनुसुचित जाती) असे दोन अपक्ष आहे. तालुक्यातून एकूण आठजण रिंगणात आहेत.

हेही वाचा: कोल्हापुरात पुन्हा 'आमचं ठरलंय'ची सोशल मीडियावर चर्चा

सोसायटी गटात राष्ट्रवादीचे निर्विवाद प्राबल्य आहे. सी.बी आप्पा आणि महा़डिकांच्या उमेदवारीमुळे मात्र रंगत आहे. जयंतराव आणि आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासाठी इथल्या सर्व जागांवरचा विजय गरजेचा आहे. त्याचवेळी तालुक्यात संघर्षाची धार कायम ठेवण्यासाठी महाडिक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, निशिकांत पाटील यांनी सर्व ते प्रयत्न सुरु केले आहेत . सर्वात जास्त ठेवी व सोसायट्यांमार्फत कर्ज देणारा वाळवा तालुकाच आहे. त्यामुळे संचालकांनाही तालुक्याच्या राजकारणात महत्व असते. त्यामुळे पुर्ण तयारीनिशी सर्वांनी रिंगणात आपली सोंगटी पुढे सरकवली आहे. महाडिक यांनी बँका-पतसंस्था गटातून तर सी. बी. पाटील यांनी प्रक्रिया मतदारसंघातून हुशारीने अर्ज ठेवले आहेत.

सोसायटी गटात दिलीप पाटील यांना तांदूळवाडीचे भानूदास मोटे यांनी भाजप आघाडीतून आव्हान दिले आहे. हीच फक्त समोरासमोरची लढत असेल. बाकी ठिकाणी इतर तालुक्यातील उमेदवार आहेत. त्यामुळे इथे क्रॉस व्होटींगची शक्यता दिसते. वाळवा तालुक्यातील जिल्हा बँकेचे मतदान हे इस्लामपूर व शिराळा या दोन विधानसभा मतदारसंघात येत असल्याने मंत्री जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांनी प्रत्येक मतदारांशी स्वतः संपर्क करत प्रचारात आघाडी घेतली आहे.

हेही वाचा: बकरीपालन भासवलं, प्रत्यक्षात ड्रग्जचा बाजार; कारखाना मालकाचा शोध सुरु

वाळवा तालुक्यातील एकुण मतदान - 515

- मतदारसंघ अ - 134
- मतदारसंघ क 1 - 163
- मतदारसंघ क 2 - 17
- मतदारसंघ क 3 - 159
- मतदारसंघ क 4 - 42

loading image
go to top