कालकुपी -02 ः कस्तुरबा (धाकटी) मंडई 

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

बदलत्या सोलापूरचा इतिहास 
चार हुतात्म्यांची पावननगरी, गिरणगाव म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहराची "स्मार्ट सिटी'कडे वाटचाल सुरु आहे. या शहराचा इतिहास खूपच रंजक आहे. बदलत्या काळानुसार अनेक बदल झाले. शहर बदलतं... वेगाने बदलतं.. जुन्या ओळखीच्या खुणांच रूप बदलतं....सोलापुरातील या खुणा पाहताना नक्कीच स्मरणरंजन होईल. या वास्तू घडताना, त्यांची जुनी रुपे पाहताना इतिहासाचे भाव जागवल जाईल. सोलापूरचा इतिहास सांगणाऱ्या कालकुपीत आज जाणून घेऊयात "कस्तुरबा (धाकटी) मंडईविषयी..... . 

सोलापूर ः धाकटी मंडई म्हणून प्रसिद्ध असलेल्या कस्तुरबा मंडईचे उद्‌घाटन तत्कालीन मध्य भारताचे अर्थमंत्री मिश्रीलाल गंगवाल यांच्या हस्ते 23 जानेवारी 1951 रोजी झाले. नगरपालिकेच्या शंभर वर्षांत सोलापूर शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. त्या प्रमाणात भाजी मंडईची व्यवस्था नव्हती. 1874 च्या सुमारास सदर बझार परिसरातील मटन मार्केट आणि भाजी विक्री हेच मंडईचे स्वरुप होते. संपूर्ण शहरातील लोक याच ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी येत होते. 

हेही वाचा... कालकुपी 01 ः सोलापुरातील कस्तुरबा मंडई 

नागरीकांची गरज ओळखून झाली "कस्तुरबा'ची उभारणी 
नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन तत्कालीन नगरपालिकेने विजापूरवेस परिसरात राणी व्हिक्‍टोरिया (सध्याचे नाव राणी लक्ष्मीबाई) हे मार्केट उभारले. त्यासाठी इमारतही उभारली. कालांतराने बाळीवेस, पांजरापोळ चौकात लोकवस्ती वाढल्याने आणखीन मंडईची गरज भासू लागली. लोकवस्ती वाढल्याने या भागातील नागरिकांनाही भाजी खरेदीसाठी विजापूरवेसला जावे लागत होते. नागरीकांची गरज ओळखून बाळीवेस परिसरात असलेल्या खुल्या जागेत कस्तुरबा मंडईची उभारणी करण्यात आली. राणी लक्ष्मीबाई मार्केटमध्ये जाणाऱ्या नागरिकांची गर्दी आणि व्यापाऱ्याची व्याप्ती मोठी होती. त्या तुलनेत कस्तुरबा मंडईची व्याप्ती आणि व्यापाराचे स्वरुप मर्यादित होते. त्यामुळे लक्ष्मीबाई मंडई थोरली, तर कस्तुरबा मंडई धाकटी मंडई म्हणून ओळखली जाऊ लागली. धाकटी मंडई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंडईचे उद्‌घाटन तत्कालीन मध्य भारताचे अर्थमंत्री मिश्रीलाल गंगवाल यांच्या हस्ते झाले. 

हेही वाचा... जाणून घ्या पंढरपूरच्या नामसंकिर्तन सभागृहाच्या कामाविषयी...

68 वर्षांत झाला मोठा बदल 
गेल्या 68 वर्षांत मंडईच्या स्वरुपात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. मूळच्या मंडईच्या इमारतीत विक्रेते बसत होते. सध्या इमारतीच्या चारही बाजूला विक्रेते बसतात. मूळच्या मंडईचा उपयोग फक्त साठा करण्यासाठी करण्यात येत आहे. इमारतीचा मूळ ढाचा आजही तोच असला तरी, चारही बाजूने दुकाने झाल्याने इमारतीचे देखणेपण झाकले गेले आहे. इमारतीच्या दोन्ही बाजूला विक्रेते बसू लागल्याने त्या ठिकाणी ओटे बांधण्यात आले आहेत. समोरच्या बाजूला पत्राशेड मारण्यात आले. मंडईच्या चारही बाजूने व्यापारी गाळे काढण्यात आले आहेत. पत्राशेड बांधलेल्या परिसरात तत्कालीन नगरपालिकेने मंजुरी दिलेले विक्रेते बसत, तर दुसऱ्या बाजूला परिसरातील गावातून आलेले विक्रेते बसतात. आजही हीच स्थिती कायम आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalkupi - 02 : solapur kasturaba market