जाणून घ्या तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या नामसंकीर्तन सभागृहाच्या कामाविषयी....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

- पंढरपूर येथे सुमारे 40 कोटी रुपये खर्चून नामसंकीर्तन सभागृह बांधण्यात येत आहे

- काही कारणांमुळे पालिकेने ठेकेदार बदलण्याचा निर्णय घेतला

- संबंधित ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतल्यामुळे हे बांधकाम गेल्या काही दिवसांपासून ठप्प

- प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने नाट्यकलावंत आणि रसिकांतून नाराजी

पंढरपूर : येथे सुमारे 40 कोटी रुपये खर्चून सुसज्ज असे नामसंकीर्तन सभागृह बांधण्यात येत आहे. कामाला सुरवात झाल्यानंतर काही दिवसांतच संबंधित ठेकेदाराची कामातील दिरंगाई आणि अन्य काही कारणांमुळे पालिकेने ठेकेदार बदलण्याचा निर्णय घेतला. संबंधित ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतल्यामुळे हे बांधकाम गेल्या काही दिवसांपासून ठप्प झाले आहे. अनेक वर्षांची नाट्यगृहाची मागणी लवकरच पूर्ण होणार असे वाटत असताना आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने नाट्यकलावंत आणि रसिकांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. 

कालकुपी ः सोलापुरातील हुतात्मा बाग ः भाग 1

पंढरपुरात एकही नाट्यगृह नाही. हे लक्षात घेऊन पालिकेने एक सुसज्ज भव्य नाट्यगृह बांधावे, अशी मागणी सातत्याने होत होती. त्याची दखल आमदार प्रशांत परिचारक यांनी घेतली. सुमारे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे पंढरपूर अर्बन बॅंकेच्या शाखेच्या उद्‌घाटनासाठी पंढरपुरात आलेले असताना आमदार श्री. परिचारक यांनी श्री. मुनगंटीवार यांच्याकडे पंढरपुरात अत्याधुनिक सुसज्ज नाट्यगृह बांधण्यासाठी निधी देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत श्री. मुनगंटीवार यांनी नाट्यगृहाच्या धर्तीवर नामसंकीर्तन सभागृह बांधण्यासाठी निधी दिला जाईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार पालिकेने सुमारे 50 हजार चौरस फुटाच्या दोन मजली सभागृहाच आराखडा तयार केला. सुमारे 40 कोटी रुपये खर्चाच्या या आराखड्यास शासनाने मंजुरी दिल्यावर या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. 

एक एकर सीताफळातून चार लाखाचे उत्पन्न

निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वीज वितरण कंपनीच्या मागील बाजूच्या जागेवर मागील वर्षी सभागृह बांधण्याच्या कामाला सुरवात देखील झाली होती. 18 महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण केले जाणार होते. त्यानुसार कामाला सुरवात करण्यात आली होती. त्यामुळे लवकरच नाट्यकलावंत आणि नाट्यरसिकांची गैरसोय दूर होईल, असे वाटत होते. परंतु कामाविषयी पालिका आणि संबंधित ठेकेदार यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने पालिकेने संबंधित ठेकेदाराकडील काम रद्द करण्याचा निर्णय घेतला. 

भावी गुरूजींच्या खांद्यावर परीक्षांचे अोझे

या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना विचारले असता ते म्हणाले, पालिकेने पहिल्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेऊन दुसऱ्या ठेकेदारास काम दिले आहे. परंतु, या दरम्यान पहिल्या ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतली असल्याने हे काम थांबवण्यात आले आहे. न्यायालयाचे या विषयी स्पष्ट निर्देश मिळताच कामाला सुरवात केली जाणार आहे. 

येथील प्रसिद्ध नाट्य कलावंत श्रीकांत महाजन बडवे म्हणाले, पंढरपुरात नाट्यगृह असावे अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. त्यानुसार सुमारे दोन हजार प्रेक्षक एकाच वेळी बसू शकतील असे हे सभागृह बांधले जाणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया लवकर पूर्ण करून हे काम वेगात पूर्ण व्हावे यासाठी पालिका पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Learn about the work of the NAMSANKIRATAN hall of the Pilgrim Pandharpur.