Kandalilav stopped
Kandalilav stopped

शेतकऱ्यांनी कांदालिलाव बंद पाडले

श्रीरामपूर (नगर ) ः बाजार समितीत आज कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तासभर लिलाव बंद पाडून निषेध केला. एका शेतकऱ्याच्या चांगल्या प्रतिच्या कांद्यास व्यापाऱ्यांनी आठ हजार रुपये क्विंटल दर पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत लिलाव बंद पाडले. याच कांद्याला मागील आठवड्यात 16 हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला होता. आज तो निम्म्यावर आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्ती करून पुन्हा फेरलिलाव सुरू करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला 10 हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला. बाजारात सध्या कांद्याची आवक घटलेली असतानाही, गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज कांद्याचे दर निम्यावर आल्याने शेतकरी नाराज झाले होते. 

आजच्या बाजारात सुमारे 300 गोण्या कांद्याची आवक झाली. प्रथम प्रतिच्या कांद्याला नऊ ते दहा हजार रुपये, द्वितीय प्रतिच्या कांद्यास साडे पाच हजार ते आठ हजार रुपये क्विंटल दर मिळाला. शेतकऱ्यांनी लिलाव होऊ द्यावे, ज्यांना लिलाव मान्य नसतील, त्यांनी आपला कांदा परत घेऊन जावे, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले. आजचा लिलाव मान्य नसल्यामुळे काही शेतकरी आपला कांदा माघारी घेऊन गेले. उत्तम लासुरे, अभय चव्हाण, दिलीप चौधरी, दिलीप उंडे, राजेंद्र चव्हाण आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

नव्या कांद्याची आवक वाढली 

दरम्यान नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात काल गावरान कांद्याला प्रतिक्विंटल 20 हजार रुपये भाव आणि लाल कांद्याला बारा हजारांचा भाव मिळाला. घोडेगाव उपबाजारात नवीन कांद्याच्या 15 हजार 637 गोण्या आणि जुन्या गावरान कांद्याच्या 442 गोण्यांची आवक झाली. त्यात खुपटी (ता. नेवासे) येथील ज्ञानेश्वर चौधरी या शेतकऱ्याने 34 गोण्या जुना कांदा आणला होता. त्यांना सर्वाधिक 20 हजार रुपये प्रतिक्‍विंटल असा भाव मिळाला. चौधरी यांनी पंधरा एकर शेतीत कांद्याचे एकूण 140 टन उत्पादन घेतले आहे. त्यांना आतापर्यंत सुमारे 85 लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित एक नंबर कांद्याला 15 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. उच्च प्रतीच्या लाल कांद्याला साडेसात ते बारा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मात्र, क्रमांक दोन आणि तीनच्या कांद्याला व्यापाऱ्यांनी एक हजार ते साडेसहा हजार रुपये भाव दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com