'या' बहाद्दराने मागितली चक्क वडापावाची खंडणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी चाेरी, खंडणी, अपघाताच्या घटना घडल्या आहेत. कराडला हाॅटेल चालकास खंडणी मागितल्याची, मांढरदेवला गडावर दागिने लंपास करण्यात आले, सातारामध्ये अपघातात अकरा जखमी झाले. पाेलिस या विविध घटनांचा तपास करीत आहेत.

कऱ्हाड : हॉटेल मालकास खंडणी मागून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल एकास अटक झाली. खंडणी बहाद्दरास पोलिसांनी फाळकूट दादा म्हणून अटक केली. पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाई झाली. विकास विठ्ठल जाधव (वय 32, रा. सैदापूर) असे अटक झालेल्याचे नाव आहे. विद्यानगर येथील हॉटेल साई गार्डनच्या मालकास धमकावून त्याला दरराेज 25 वडापाव आणि दोन हजारांची खंडणी मागितली होती. तर त्याच्या हॉटेलवर फुकट खावून त्यांना धमकावले होते. तक्रार दाखल झाल्यानंतर विकास जाधवला त्वरित अटक केली. गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार सतीश जाधव, प्रफुल्ल गाडे, राजेंद्र जारी, संजय गाडे, मारुती लाटणे यांनी तपास करून जाधवला अटक केली. गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे तपास करीत आहेत. 

मांढरदेव येथून भाविकाचे दागिने लंपास 

वाई : मांढरदेव येथे अज्ञात चोरट्याने सुमारे 75 हजार किमतीचे दागिने चोरल्याची फिर्याद मंगल पोपट थोरात (वय 50, रा. हडपसर, पुणे) यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगल थोरात व त्यांचे पुण्यातील नातेवाईक रविवारी (ता. नऊ) दुपारी पाऊण ते दोनच्या दरम्यान मांढरदेव येथे पौर्णिमा असल्याने देवदर्शनाला आले होते. यावेळी गोंजीरबाबा, मांगीरबाबा मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी पावणेदोन तोळ्यांची तीन पदरी पोत व सोबतच्या नातेवाईक महिलेचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र असे दागिने एकूण 75 हजारांचा ऐवज लंपास केला. अधिक तपास वाई पोलिस करीत आहेत. 
 
मोटार अपघातात अकरा जखमी 

सातारा : शहरालगत महामार्गावर क्वॉलिस कार पलटी झाल्याने कारमधील अकरा जण जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. अपघातग्रस्त सर्वजण नेरुळ (मुंबई) येथील रहिवासी आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी सकाळी सहाच्या सुमारास क्वॉलिस कारचा ऍक्‍सल तुटल्याने हॉटेल मानससमोर हा अपघात झाला. या अपघातात रवी थोरात, नंदा वाघमारे, पिंकी माने, विजया पवार, शोभा थोरात, राजेश माने, बाळू थोरात, प्रथम माने, अंश पवार, तन्वी वाघमारे, अनिता बगाडे (सर्व रा. नेरुळ, मुंबई) हे जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

आटकेतील बंद घरात चोरी 

कऱ्हाड ः बंद घराच्या दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्यांनी तीन तोळ्याचे दागिने लंपास केले. आटके (ता. कऱ्हाड) येथे काल रात्री उशिरा ही घटना घडली. भास्कर कोंडावळे यांनी त्याची फिर्याद दिली आहे. श्री. कोंडावळे काल कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. त्यावेळी ती संधी साधून चोरट्याने त्याच्याकडील बनावट चावीने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडले. घरातील कपाटात ठेवलेली तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने त्याने लंपास केले. आज सकाळी घटना उघडकीस आली. 

हेही वाचा : ...म्हणून वडिलांनी घातला मुलावर कुऱ्हाडीचा घाव

वाचा :  रसिकांची नजर व नियत बदललीय : रघुवीर खेडकर

वाचा : वाचनप्रेमींसाठी धक्कादायक बातमी; पुस्तकांचं गाव गुंडाळणार ?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Gunda Arrested For Ransom Of Wadapav