रसिकांची नजर व नियत बदललीय : रघुवीर खेडकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

साकूर येथील सदोबा यात्रेनिमित्त कला सादर करण्यासाठी आलेल्या तमाशा मंडळातील कलावंतांना मद्यपींनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. 4) तमाशा संपल्यानंतर घडली. मारहाण झालेल्यात महिलांसह पुरुष कलाकारांचा समावेश आहे. याप्रकाराचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

ढेबेवाडी (जि. सातारा)  : लोकरंजनातून लोकसेवा करणारे कलावंत ही महाराष्ट्राची संपत्ती आहे. मात्र, याच मातीत कलावंतांवर होणारे हल्ले ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची बाब आहे, अशी भावना प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
 
ते म्हणाले, ""कलेचा आदर आणि जोपासना करणारी गावे कलाकारांना मारहाण करू लागली, तर आम्ही कलाकारांनी जायचे कुठे? वास्तविक कला सादरी करणासाठी दुसऱ्या राज्यात जाताना आम्ही घाबरायला पाहिजे; परंतु आमच्याच राज्यात येणारे असे अनुभव दुःखदायक आहेत. इतर राज्यातील लोक त्यांच्या लोककलेची कशी जोपासना करताहेत ते पाहा आणि तुम्ही काय करायला लागलाय याचे जरूर आत्मचिंतन करा. तमाशा बिघडलेला व बदललेला नाही, तुम्ही बदललाय, तुमची अभिरुची, नजर व नियत बदललीय. तमाशा जिवंत ठेवायचा असेल, तर शासनाने आता त्याला संरक्षण पुरवण्याबरोबरच तसा कायदाही करायला पाहिजे. यामध्ये तमाशा लहान किंवा मोठा हा प्रश्नच येत नाही, अशा घटना महाराष्ट्राच्या लोककलेवरचाच हल्ला आहे. यात्रा समिती व गाव कारभाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडायला हव्यात. कलावंत गावी आल्यापासून सुखरूप परत जाईपर्यंत त्यांचीही जबाबदारी आहे. साधारण दहा वर्षांपासून अशा घटनांचा अनुभव तमाशा मंडळे घेत आहेत. अलीकडे दोन- तीन वर्षांपासूनचे त्याचे वाढलेले प्रमाण निश्‍चितच गांभीर्याने विचार करायला लावणारे आहे.'' 

दोषींवर कडक कारवाई करणार  :  गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

साकूर (जि. नाशिक) येथे तमाशा कलावंतांना झालेल्या मारहाणीची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दै "सकाळ'ला सांगितले. महाराष्ट्राची ओळख बनलेली लोककला टिकण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असून, अशा घटनांना पायबंद घालून लोककलावंतांना संरक्षण देण्यासाठी आणखी कठोर पाऊले उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

साकूर येथील सदोबा यात्रेनिमित्त कला सादर करण्यासाठी आलेल्या तमाशा मंडळातील कलावंतांना मद्यपींनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. 4) तमाशा संपल्यानंतर घडली. मारहाण झालेल्यात महिलांसह पुरुष कलाकारांचा समावेश आहे. स्वतःचे दुःख व प्रश्न बाजूला ठेवून पोटापाण्यासाठी घर, गाव सोडून रात्रीचा दिवस करणाऱ्या तमाशा कलावंतांत आणि त्यांच्या कुटुंबीयांत या घटनेने दहशतीचे वातावरण आहे. याबद्दल मंत्री देसाई यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, ""पिढ्यान्‌पिढ्या लोककलेची जोपासना करणाऱ्या लोककलावंतांना कार्यक्रमस्थळी पोलिस संरक्षण देण्यात येईल. रीतसर परवानगी आणि कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यावर मागणी आल्यास संरक्षणाबाबतची कार्यवाही केली जाईल. स्थानिक जबाबदार मंडळी आणि प्रेक्षकांनीही दहशतमुक्त आणि भयमुक्त वातावरणात कलेच्या सादरीकरणासाठी कलावंतांना जबाबदारीपूर्वक सहकार्य करायला पाहिजे.'' 

हेही वाचा : साताऱ्याचा हवालदार नडला पुण्याच्या पोलिस अधीक्षकांना

वाचा : ...म्हणून वडिलांनी घातला मुलावर कुऱ्हाडीचा घाव

हेही वाचा : तमाशातच भयंकर तमाशा! दारूची नशा अन् कलांवतांसोबत धक्कादायक प्रकार!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tamasha Artist Should Be Secured Says Raghveer Khedkar