Karnataka: राज्यात एसीबीचे छापासत्र; पाईप व बादलीतही पैसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka: राज्यात एसीबीचे छापासत्र; पाईप व बादलीतही पैसे
राज्यात एसीबीचे छापासत्र; पाईप व बादलीतही पैसे

Karnataka: राज्यात एसीबीचे छापासत्र; पाईप व बादलीतही पैसे

बंगळूर : एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी १५ अधिकाऱ्यांच्या घरे व कार्यालये अशा ६० ठिकाणांवर छापे टाकले. त्यांच्या मिळकतीची चौकशी सुरू होती. या छाप्यात ८ एसपी, १०० अधिकाऱ्यांसह ४०८ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पथकाचा समावेश होता. एकाच वेळी छापे घालून अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी सुरू केली. अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे मालमत्ता मिळविली असल्याच्या शेकडो तक्रारी आल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. छाप्यात सापडलेल्या मालमत्तेची एकत्रित मोजणी करताना अधिकाऱ्यांची दमछाक झाली.

हेही वाचा: ST Strike: "कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या सकाळी भूमिका स्पष्ट करु"

गदग येथील कृषी विभागाचे सहसंचालक टी. एस. रुद्रेशप्पा, दोड्डबळ्ळापूर येथील महसूल अधिकारी लक्ष्मीकांतय्या, जेवरगी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस. एम. बिरादार, गोकाकचे वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक सदाशिव मरलिंगन्नावर, बंगळूर शहरातील सकाल केएएस अधिकारी नागराजू, यलहंका सरकारी रुग्णालयाचे फिजिओथेरपिस्ट राजशेखर, बीबीएमपी कर्मचारी बागलुगुंडे गिरी, गुलबर्गा येथील शांतनगौडर, मंगळूर महानगर कार्यकारी अभियंता के. एस. लिंगेगौडा, हेमावती डावा कालवा कार्यकारी अभियंता श्रीनिवास के., बंगळूर निर्मिती केंद्राचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालेले वासुदेव, रायबाग येथील सहकार खात्याचे विकास अधिकारी ए. के. मास्ती, बेळगाव हेस्कॉमचे लाईन मेकॅनिक द्वितीय दर्जा अधिकारी नाथाजी पाटील, बळ्ळारीचे निवृत्त उपनिबंधक शिवानंद, नंदिनी डेअरी बंगळूरचे सरव्यवस्थापक बी. कृष्णारेड्डी यांच्या घरे व कार्यालयांवर छापे टाकून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती एसीबीचे पोलिस महासंचालक सिमांतकुमार सिंग यांनी दिली.

हेही वाचा: 'चंद्रकांत पाटलांनी भाकीत व्यक्त करण्याचा व्यवसाय सुरू केलाय'

पाईप व बादलीतही पैसे

एसीबीच्या जाळ्यात सापडलेल्या एका अधिकाऱ्याच्या घरातील पाईपमध्ये लाखो रुपये लपवून ठेवल्याचे आढळून आले. एवढेच नाही तर बादलीतही पैसे भरून ठेवल्याचे आढळून आले.

बेळगाव जिल्ह्यात तिघांची चौकशी

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) बुधवारी (ता. २४) बेळगावात तीन अधिकाऱ्यांवर छापे घातले. बेळगाव हेस्कॉमचे लाईन मेकॅनिक द्वितीय दर्जा अधिकारी नाथाजी पिराजी पाटील, गोकाकचे वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक सदाशिव रायप्पा मरलींगन्नावर, रायबाग येथील सहकार खात्याचे विकास अधिकारी ए. के. मास्ती यांच्या घर आणि कार्यालयांवर एसीबीने छापे टाकले. मोटार वाहन निरीक्षक मरलींगन्नावर यांच्या गोकाक विवेकानंदनगर येथील निवावसस्थान, रामदुर्ग तालुक्यातील कोळ्ळूर गावातील घर, बेळगाव रामतीर्थनगर येथील घर, मुधोळ येथील भावाच्या घरात जाऊन अधिकाऱ्यांनी चौकशी केली.

हेही वाचा: लाचखोर पोलिस उपनिरीक्षक, शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

हेस्कॉमचे अधिकारी पाटील यांचे वैभवनगर येथील निवासस्थान, त्यांच्या कंग्राळी बुद्रुक येथील मेहुण्याचे घर, महांतेशनगर येथील हेस्कॉम कार्यालय येथेही पथकाने चौकशी केली. रायबाग सहकार खात्याचे विकास अधिकारी मास्ती यांचे बैलहोंगल येथील निवासस्थान, तेथीलच मित्राचे घर व कार्यालयावर एसीबी अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून चौकशी केली. जिल्ह्यातील या कारवाईत एसीबीचे ४ उपअधीक्षक, १५ निरीक्षक आणि ६० कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. यासंबंधी तिन्ही अधिकाऱ्यांवर एसीबी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

loading image
go to top