Video : कोल्हापुरातील बिंदु चाैकात अनोखा लग्न सोहळा; ही वधू अन् हा वर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

विवाह समारंभात ज्याप्रमाणे अक्षता म्हटल्या जातात. त्याप्रमाणे अक्षता म्हणून फुले टाकली. बिंदू चौकातून ये-जा करणाऱ्यांच्या दृष्टीने हे आंदोलन उत्सुकतेचा विषय ठरले. डोक्‍यावर पिवळ्या रंगाच्या टोप्या परिधान करून खड्डेपूर कोल्हापूर असा प्रतिकात्मक मजकूर त्यावर होता. 

कोल्हापूर - खड्‌ड्‌यांचे लग्न अशी अनोखी संकल्पना राबवून जिल्हा वाहनधारक महासंघाने आज बिंदू चौकात आंदोलन केले. यावेळी चि. डांबर व साै. खडी यांचे प्रतिकात्मक लग्न लावून खड्ड्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. 

शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर विविध मार्गांनी आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून बिंदू चौक येथे आज सकाळी डांबराचे बॅरेल उभारले. दुपारी साडेबाराच्या सुमारास महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुरोहितांच्या उपस्थितीत खडी व डांबराचे प्रतिकात्मक लग्न लावले. विवाह समारंभात ज्याप्रमाणे अक्षता म्हटल्या जातात. त्याप्रमाणे अक्षता म्हणून फुले टाकली. बिंदू चौकातून ये-जा करणाऱ्यांच्या दृष्टीने हे आंदोलन उत्सुकतेचा विषय ठरले. डोक्‍यावर पिवळ्या रंगाच्या टोप्या परिधान करून खड्डेपूर कोल्हापूर असा प्रतिकात्मक मजकूर त्यावर होता. 

वाहतूक सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, रिक्षाचालक सेनेचे राजू जाधव, विजय गायकवाड, दिलीप सूर्यवंशी, अशोक जाधव, इंद्रजीत आडसुळे, निलेश हंकारे, भारत चव्हाण, दिन महंमद शेख, रियाज जमादार, धनाजी जाधव, काका मोहिते, विजय जेधे, तानाजी पाटील, शामराव पाटील, सुरेश पंदारे, उस्मान मिरजकर, पोपट रेडेकर, पुष्पक पाटील, वसंत पाटील, संजय पाटील आदींचा आंदोलनात सहभाग होता. 

निधी मंजूर होऊनही अपेक्षित काम नाहीच 
शहरात महापुरानंतर बहुतांशी रस्त्यांची चाळण झाली आहे. महापालिकेतही त्याचे पडसाद उमटले. 1 कोटी 23 लाख निधी पॅचवर्कसाठी मंजूर झाला. मात्र, अद्यापही अपेक्षेप्रमाणे काम सुरू नसल्याने शहरवासियांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचेच एक प्रतीक म्हणून आजचे आंदोलन झाले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadi And Dambar Marriage in Kolhapur Bindhu Chouk