गांजाची विक्री खुलेआम...

निखिल पंडितराव
गुरुवार, 5 एप्रिल 2018

कोल्हापूर - गांजाची खुलेआम विक्री करून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम शहरात रोज होत आहे. शाळकरी मुलांसहीत यात काही अट्टल गुन्हेगारांना गांजा 
सहज उपलब्ध होऊ लागला आहे. १० ते ५० रुपयांपर्यंत या गांजाची विक्री सर्रास होत आहे. ग्रामीण भागातील मुलेही या नशेच्या आहारी जात आहेत. 

कोल्हापूर - गांजाची खुलेआम विक्री करून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम शहरात रोज होत आहे. शाळकरी मुलांसहीत यात काही अट्टल गुन्हेगारांना गांजा 
सहज उपलब्ध होऊ लागला आहे. १० ते ५० रुपयांपर्यंत या गांजाची विक्री सर्रास होत आहे. ग्रामीण भागातील मुलेही या नशेच्या आहारी जात आहेत. 

गांजाची नशा ही पूर्वी गुन्हेगार किंवा काही गुंडांपुरतीच मर्यादित होती; परंतु आता गांजाची नशा करणाऱ्यांचे लोण पसरत आहे. शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील काही भागांत शाहूवाडी, राधानगरी परिसरांत काहीजण शेतात छुप्या पद्धतीने गांजाचे पीक घेतात. तेथूनच हा गांजा विक्रीसाठी शहरात येतो. गारगोटी, गडहिंग्लज, निपाणी परिसरांत १४ ते १६ वयोगटांतील शालेय मुले याच्या नशेच्या अधिक आहारी जात असल्याचे पुढे आले आहे. सामाजिक बदल होताना गांजासारख्या नशेच्या अमली पदार्थांची ही खुलेआम विक्री निश्‍चितच डोकेदुखी देणारी आणि तरुण पिढीला बरबाद करणारी आहे. शहरातील काही ठिकाणे गांजा विक्रीसाठी प्रसिद्ध असल्यासारखी स्थिती आहे. गांजा पिणारे अनेकजण शहराच्या मध्य वस्तीत बसून दररोज नशेच्या आहारी जात आहेत. काही ठिकाणी तर जथ्थेच्या जथ्थेच जमत असल्याचे चित्र दिसते. 

या प्रकरणी संबंधित लोकांनी कारवाई करणाऱ्या यंत्रणेला अनेक वेळा सांगितले तरी ठोस कारवाई होत नाही. गांजा तयार करणाऱ्या, विकणाऱ्या अशा सगळ्यांनाच कायद्याचा जरब बसेल, अशा कारवाईची गरज आहे. 

पौगंडावस्थेत असताना मुलांना नशेची सवय लागते. १४ ते १६ वयोगटांतील मुले या चुकीच्या गोष्टीकडे वळतात. त्यांना या गोष्टी सहज किंवा मित्राच्या, मित्राच्या ओळखीच्या व्यक्तीकडून उपलब्ध होऊ लागल्या आहेत. ग्रामीण भागातील मुलांत याचे प्रमाण अधिक आहे. मुलांसोबत चुकीच्या संगतीचा किंवा पिअर प्रेशरमुळे ही मुले या नशेच्या आहारी जातात. यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. या मुलांचे कौन्सिलिंग करून त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण करत असतो.
- डॉ. निखिल चौगुले, मानसोपचारतज्ज्ञ.

या कारणांमुळे नशेची सवय
 काय होते, एकदा करून पाहूया म्हणून.
 चुकीच्या संगतीमुळे कर रे, काय होते, नशेला सुरुवात.
 एकदा नशेला सुरुवात झाली की, मेंदूला त्याची झिंग चढते आणि नशेच्या अमलाखाली मुले अडकतात.

मुलांकडून टोपण नावांचा वापर
 ग्रास   हर्ब   वीड   पॉट   मॉल 

या परिसरात गांजाची होते विक्री..
 पांजरपोळ, वीज वितरण कार्यालयाजवळ (दोघे, यात एक महिला)
 प्रतिभानगर, मालती अपार्टमेंटजवळ (एक)
 भुयेवाडीजवळ (तिघे जण) 
 कसबा बावडा परिसर (एक)
 विक्रमनगर परिसर (एक)
 पंचगंगा नदीजवळचा परिसर (एक)

Web Title: kolhapur news ganja sailing crime