दो हॅंसो का जोडा बिछड गयो रे...

निखिल पंडितराव
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

प्रेम प्रकरणाचा करुण अंत - कायद्यासमोर माणुसकीही पडली फिकी

प्रेम प्रकरणाचा करुण अंत - कायद्यासमोर माणुसकीही पडली फिकी

कोल्हापूर - सोनाली (नाव बदलले) पंधरा वर्षांची. दिनेश (नाव बदलले) त्या गावातील सज्ञान तरुण. सोनाली शाळेत जात होती; पण त्याच वेळी दिनेशची आणि तिची ओळख झाली. नंतर दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. हे प्रेम नुसते शारीरिक आकर्षणापुरते नव्हते. एकमेकांवर नितांत प्रेम होते. मुलीच्या घरात प्रेमप्रकरण समजले, तेव्हा कडाडून विरोध झाला. जातिपातीच्या भिंती त्यांच्याआड आल्या. टोकाचा विरोध सुरू झाला; पण प्रेमाला जातिपातीची भिंत नसते, ते प्रेमच असते. हे ओळखून प्रेम केले तर निभवायचे, असा ठाम निर्धार करून दोघेही घर सोडून पळून गेले. त्यांनी विवाहही केला. 

इकडे पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी कायद्यानुसार सारी कलमे लावून गुन्हा दाखल केला. दोघांचा शोध घेतला; पण सापडले नाहीत. दोन वर्षे पोलिसांचा तपास तसाच राहिला. इकडे सोनाली व दिनेशचा सुखी संसार सुरू होता. दिनेशही एक ठिकाणी कामाला जात होता. दोघांपुरते मिळवत होता; परंतु एक दिवस सोनालीच्या पाठीत कळ आली. पाठीतील कळ म्हणजे कामामुळे सळक भरली असेल, असा समज करून तिने दुर्लक्ष केले. पुढे तिची पाठदुखी सुरूच होती, दिनेशला सोनालीची ती अवस्था स्वस्थ बसू देईना.

तिला घेऊन तो डॉक्‍टरांकडे गेला. डॉक्‍टरांनी तपासणी केली; पण त्यामध्ये फारसे गांभीर्य आढळले नाही. थोडे दिवस गेल्यावर सोनालीच्या पाठीतील दुखणे वाढतच चालले. डॉक्‍टरांना संशय वाटला म्हणून त्यांनी तिच्या विविध तपासण्या केल्या आणि दिनेश व सोनालीच्या आयुष्याला कलाटणी मिळणारा डॉक्‍टरांचा अहवाल हातात आला. सोनालीला ‘कॅन्सर’ असल्याचे निदान झाले. 

अहवालानंतर सोनाली व दिनेश सुन्न झाले. सुखी संसाराची स्वप्ने पाहत असतानाच दु:खाचा डोंगरच उभा ठाकला; पण त्या दोघांनी यावरही मात करण्याचे ठरवले. एकीकडे सोनालीला कॅन्सरचे निदान झाले असतानाच पोलिसांना त्यांचा ठिकाणा समजला. ते राहत असलेल्या गावात पोलिस पोचले आणि दोन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये दिनेशला अटक झाली. सोनालीला ताब्यात घेतले. जेव्हा सोनालीला कॅन्सर झाल्याचे तिच्या घरातील लोकांना समजले, तेव्हा मुलीने मनाविरुद्ध प्रेम केले, पळून गेली, याचा राग तिच्या कुटुंबीयांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी सोनालीला आपली म्हणून स्वीकारलीच नाही. ‘ती आपल्यासाठी मेली आहे’, अशी भूमिका त्यांनी घेतली. तिकडे पती कारागृहात आणि घरच्यांनी नाकारल्याने सोनालीचे हाल आणखीच वाढले. काही दिवसांत दिनेश जामिनावर बाहेर आला. 

सोनाली रुग्णालयात असल्याचे समजल्यावर तो तिला भेटण्यासाठी गेला. त्यांच्या डोळ्यातील अश्रूच सारे काही बोलत होते. सोनालीला दिनेशच्या घरी जायचे होते; पण कायद्याने ती जाऊ शकत नव्हती. दिनेशच्या घरातील लोक सोनालीला भेटण्यासाठी रुग्णालयात येत होते. सोनालीची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. दिनेशला ते पाहवत नव्हते. एक दिवस दिनेश सोनालीला भेटून कामावर चालला होता. त्या वेळी चेहरा हसरा करून पाणीदार डोळ्याने तिने दिनेशला एक दहा मिनिटे थांबवण्यास सांगितले. दिनेशचा हात हातात घेतला आणि दहा मिनिटांतच सोनालीची प्राणज्योत मालवली आणि ‘दो हॅंसो का जोडा बिछड गयो रे...’ या गाण्यातील बोलाप्रमाणेच दोघांची ताटातूट झाली. दिनेशचा अश्रूचा बांध फुटला.  

कायद्याच्या एका मंडळासमोर आलेली ही सत्य घटना आहे. सोनाली आणि दिनेशचे हे प्रेम कायद्याच्या नजरेत चुकीचे आहे. अगदी बालविवाहपासून सारे काही कायदे याला लागतील; पण दोघांचे प्रेम तितकेच खरे होते. यातून बालविवाहाचे समर्थन करण्याचा अजिबात हेतू नाही; पण सोनाली आणि दिनेशला थोडासा आधार मिळाला असता तर सोनालीला वाचविण्यासाठी धडपड नक्कीच करता आली असती...

Web Title: kolhapur news love story