कोल्हापुरातील मटणाच्या दराचा वाद उच्च न्यायालयात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

कोल्हापूरमधील गारगोटी आणि कडगाव ग्रामपंचायतीविरोधात मटण विक्रेत्यांनी न्यायालयान याचिका दाखल केली आहे. या दुकानदारांनी मटणाची विक्री 360 ते 380 रुपये दराने करावी अन्यथा आपले दुकान बंद ठेवावे, अशी सक्ती ग्रामपंचायतीने केल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई - कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खवय्यांना आवडणाऱ्या पांढरा आणि तांबड्या रश्‍शासाठी लागणाऱ्या मटणाच्या दराचा वाद आता उच्च न्यायालयात दाखल झाला आहे. कमी भावात मटण विक्रीची सक्ती करणाऱ्या कोल्हापूरमधील दोन ग्रामपंचायतीविरोधात न्यायालयात मटण विक्रेत्यांनी याचिका दाखल केली आहे. 

कोल्हापूरमधील गारगोटी आणि कडगाव ग्रामपंचायतीविरोधात मटण विक्रेत्यांनी न्यायालयान याचिका दाखल केली आहे. या दुकानदारांनी मटणाची विक्री 360 ते 380 रुपये दराने करावी अन्यथा आपले दुकान बंद ठेवावे, अशी सक्ती ग्रामपंचायतीने केल्याचे सांगण्यात येत आहे. जर या शर्तींचे भंग केला तर दुकानाला सीलबंद करण्यात येईल, असेही याचिकादार विक्रेत्यांना सुनावण्यात आले आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी ऍड धैर्यशील सुतार यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. साधना जाधव यांच्यापुढे उल्लेख करण्यात आला. अन्य गावांमध्ये मटणाचा भाव प्रति किलो 560 ते 580 रुपये आहे. त्यामुळे कमी दरात विक्री करण्याची सक्ती ग्रामपंचायत करु शकत नाही, असा दावा याचिकादारांने केला आहे.

हेही वाचा - मी पुन्हा आलो; पण एवढ्या सकाळी सकाळी... 

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार अशाप्रकारचे दर निश्‍चितीबाबतचे बंधन घालण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नाही. त्यामुळे अशाप्रकारची सक्ती करणे अवैध आहे, असा दावा याचिकेत केला आहे. याचिकेवर सुनावणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे. 

हेही वाचा - मुंबईतील राजकीय भूकंपाचे कोल्हापूर जिल्ह्यात धक्के 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Rate Of Mutton Dispute In High Court