कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षनिवडीसाठी 'खलबते' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

भाजपचे नेते व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आहेत. नूतन नगरपंचायत निवडणुकीचा ते आढावा घेत आहेत. याचबरोबर आमदार पाटील जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी कधी बोलावतात, याकडे भाजप सदस्यांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी रात्री याबाबत आमदार पाटील काही भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर बैठकीचे नियोजन केले जाणार आहे. 

कोल्हापूर  : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. महिनाभरानंतर जिल्ह्यात दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्या इच्छुकांकडून भेटीगाठी सुरू झाल्या आहेत; तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी भाजपचे इच्छुक संपर्क साधून आहेत. या आठवड्यात सर्वच प्रमुख पक्षांचे नेते व सदस्यांत जिल्हा परिषद निवडणुकीबाबत खलबते सुरू झाली आहेत. 

जिल्हा परिषदेत भाजप व मित्रपक्षांची सत्ता आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल दोन महिन्यांपूर्वीच संपला आहे ; मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या निवडी पुढे ढकलल्या होत्या . साधारणपणे वेळापत्रकात बदल झाला नाही , तर येत्या 23 डिसेंबरला नूतन अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड होण्याची शक्‍यता आहे . तसेच मंत्रिमंडळ विस्तार व नागपूर अधिवेशन याचा विचार करून या निवडी पंधरा दिवसांसाठी पुढे ढकलण्याबाबतही चर्चा आहे ; मात्र राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचे जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम दिसू लागले आहेत. जिल्हा परिषदेत राज्याप्रमाणेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तनाच्या हालचाली वाढल्या आहेत. 

अध्यक्षपदासाठी हे आहेत प्रमुख दावेदार

यावेळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा ओबीसींचा होणार आहे . कॉंग्रेसकडे चार-पाच इच्छुक उमेदवार आहेत. यांत पांडुरंग भांदिगरे , अरुण सुतार , शिल्पा खोत हे प्रमुख दावेदार आहेत. राष्ट्रवादीकडून सतीश पाटील , जयवंतराव शिंपी , युवराज पाटील प्रमुख दावेदार आहेत . यांतील सतीश पाटील अध्यक्षपदासाठी सर्वाधिक प्रबळ दावेदार असून , त्यांच्या शिष्टमंडळाने आमदार मुश्रीफ यांना गळ घातली आहे. गडहिंग्लजला कधीही अध्यक्षपद मिळालेले नाही . त्यामुळे काहीही करून सतीश पाटील यांच्या माध्यमातून तालुक्‍याला न्याय देण्याची मागणी केली आहे . भाजपकडून अरुण इंगवले , प्रसाद खोबरे; तर जनसुराज्यकडून शंकर पाटील , शिवाजी मोरे , मनीषा माने दावेदार आहेत . 

आमदार कोरेंना सोबत घेण्याची तयारी 

जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे भाजपसोबत आहेत ; मात्र राज्यात आता आघाडीचे सरकार असल्याने आमदार कोरे यांची भूमिका काय राहणार , याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे . कोरे हे भाजपचे सहयोगी सदस्य असले , तरी जिल्ह्यात त्यांची शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक , राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत . त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात कोरे यांनी आघाडीसोबत राहावे , याबाबत प्रयत्न सुरू आहेत . असे झाले तर जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेतून बाहेर जावे लागणार आहे. 

शिवसेना सदस्यांनी घेतली सतेज पाटील यांची भेट 

भाजप आघाडीत असलेल्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली . वैयक्‍तिक कारणास्तव जरी ही भेट झाली असली , तरी अध्यक्ष निवडीबाबत त्यांनी आमदार पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे . या दोन सदस्यांना जय महाराष्ट्र करण्याच्या सूचना दिल्याचे समजते . पुढील दोन-तीन दिवसांत बऱ्यापैकी नेत्यांची व सदस्यांची भूमिका स्पष्ट होईल. 

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निरोपाकडे लक्ष 

भाजपचे नेते व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आहेत . नूतन नगरपंचायत निवडणुकीचा ते आढावा घेत आहेत. याचबरोबर आमदार पाटील जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी कधी बोलावतात, याकडे भाजप सदस्यांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी रात्री याबाबत आमदार पाटील काही भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर बैठकीचे नियोजन केले जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Zilha Parishad President Election In Picture