

कोल्हापूर : ‘सेनेला झुकते माप’, अशा प्रकारचे वक्तव्य पालकमंत्र्यांनी केले आहे. शिवसेनेचे (shivsena) संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी नेहमीच संपर्क साधत असाल तर त्यांच्या माघारी शिवसेनेच्या नगरसेवकांना जेवणासाठी बोलवून त्यांच्याकडून समित्यांसाठी परस्पर नावे घेण्याचे कारण काय, कॉंग्रेसला (congress) जिल्हा नियोजन समितीकडून ११ कोटी आणि नगरविकास विभागाकडून १० कोटी, राष्ट्रवादीला २५ कोटींचा निधी दिला आहे.
शिवसेनेसही १५ कोटींचा निधी हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या आदेशाने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दिला असून, त्याचे श्रेय पालकमंत्र्यांनी घेऊ नये. शिवसैनिकांना पदे आणि निधी मिळाल्याचे श्रेयही शिवसेना नेत्यांचेच असल्याचा पलटवार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वार केला आहे.
पत्रकात म्हटले आहे, शहर विकासासाठी १५ कोटींचा निधी मिळवण्यासाठी मी पाठपुरावा केला आणि निधी दिला, याचे दुःख पालकमंत्र्यांना झाले. निधीला विरोध करण्यासाठी पालकमंत्री आदित्य ठाकरेना का भेटले, जिल्हा नियोजन समितीमधून पालिकेच्या अनुसूचित जाती जमातीच्या ११ मतदारसंघासाठी ११ कोटींचा निधी मंजूर झाल्यावर तो निधी फक्त कॉंग्रेसच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना दिला. त्या वेळी पालकमंत्र्यांना महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीची (NCP) आठवण का नाही?
कार्यकारी अध्यक्ष पदावर माझी नियुक्ती २०१९ च्या निवडणुकीपूर्वीच झाली आहे. त्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना आहे. आमदार प्रकाश आबिटकर (prakash aabitkar) यांचीही नियुक्ती मुख्यमंत्र्यामुळे झाली. ‘गोकुळ’मध्येही शासन नियुक्त सदस्य म्हणून जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नियुक्तीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असताना पुन्हा तांत्रिक बाबीचे कारण काढून नियुक्ती का रखडली? बाजार समिती, वडगाव बाजार समिती, संजय गांधी निराधार योजना अशा ठिकाणी पालकमंत्र्यांनी त्यांच्या मर्जीतील लोकांची नियुक्ती केली आहे. अरुण दुधवडकर हे संपर्कप्रमुख आहेत. त्यांना लेखी द्यायचे असेल तर ते पक्षप्रमुख अथवा वरिष्ठ नेत्यांकडे देतील. पालकमंत्र्यांनी संपर्कप्रमुखांकडे लेखी तक्रार मागणे हास्यास्पद आहे.
गद्दारांची मदत
शिवसेनेचे बोट धरूनच पालकमंत्र्यांचा विधानसभेत प्रवेश झाला. शिवसेनेचे त्यांच्यावर हे एकप्रकारे उपकारच आहेत. काही गद्दारांना सोबत घेऊन त्याच शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले.