Mega Recruitment : कोल्‍हापूर जिल्‍हा परिषदेची ७७४ पदांसाठी होणार जम्‍बो भरती

अनेक वर्षे नोकर भरतीची मागणी होत होती. सर्वच सरकारांनी नोकरभरतीची घोषणा केली, अर्ज मागवले व नंतर परीक्षांना स्‍थगिती दिली. आता पुन्‍हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Kolhapur ZP
Kolhapur ZPSakal
Summary

अनेक वर्षे नोकर भरतीची मागणी होत होती. सर्वच सरकारांनी नोकरभरतीची घोषणा केली, अर्ज मागवले व नंतर परीक्षांना स्‍थगिती दिली. आता पुन्‍हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कोल्‍हापूर - राज्य शासनाने जाहीर केलेल्या सूचनेनंतर नोकरभरतीला मुहूर्त मिळाला आहे. जिल्‍हा परिषदेची आजअखेर ८२६ पदे रिक्‍त आहेत. यापैकी ८० टक्‍के म्‍हणजे ७७४ पदांची भरती केली जाईल. साधारणपणे एप्रिल २०२३ अखेर निवड झालेल्या उमदेवारांना नियुक्‍तिपत्रे दिली जाणार आहेत. मात्र, या सर्व नोकरभरतीत रोष्‍टरची अडचण येत आहे. आजअखेर निवड झालेल्या कर्मचाऱ्यां‍च्या निवडीचे आदेश मागासवर्ग कक्षाने मागविले आहेत. मात्र, कर्मचारी संख्या मोठी असल्याने या आदेशाची शोधाशोध सुरू झाली. सुटीच्या दिवशीही कागदपत्रांचा शोध घेतला जाणार आहे.

अनेक वर्षे नोकर भरतीची मागणी होत होती. सर्वच सरकारांनी नोकरभरतीची घोषणा केली, अर्ज मागवले व नंतर परीक्षांना स्‍थगिती दिली. आता पुन्‍हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्‍हा परिषदेकडे एकूण १९ प्रवर्ग व ४९ प्रकारची पदे आहेत. एकूण मंजूर पदांची संख्या दोन हजार ६५७ इतकी आहे. यातील एक हजार ८३१ पदे भरली असून, ८२६ पदे रिक्‍त आहेत. यातील ७७४ पदांसाठी नोकर भरती होणार आहे. या नोकर भरतीसाठी टीसीएस कंपनीची निवड करण्यात आली. त्या अनुषंगाने सर्व खातेप्रमुख व कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी जाहिरात प्रसिद्ध करेपर्यंतची जबाबदारी ही जिल्‍हा परिषदेची राहणार असून, पेपर तयार करणे, परीक्षा घेणे, केंद्रांची निवड करणे व अंतिम निवड यादी देण्यापर्यंतची जबाबदारी कंपनीवर सोपविण्यात आली आहे.

पहिल्या टप्‍प्यात आरोग्य विभागातील रिक्‍त जागांसाठी परीक्षा होणार आहे. साधारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. तर उर्वरित पदांसाठीची जाहिरात ही फेब्रुवारीत प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान, सर्वच पदांची नोकरभरती करण्यापूर्वी सध्या कार्यरत असणाऱ्या‍ सर्व कर्मचाऱ्यां‍ची संवर्गनिहाय माहिती व निवडीबाबतची कागदपत्रे मागवण्यात आली आहेत. या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच रोष्टर निश्‍चिती केली जाणार आहे. यासाठी २७ व २८ डिसेंबरला रोष्टर तपासणीसाठी सर्व विभागांची माहिती पाठवण्यात येणार आहे. सध्या कृषी विभागाचेच फक्‍त रोष्टर मंजूर करण्यात आले आहे. कृषी विभागाची कर्मचारी संख्या कमी असून सर्वाधिक कर्मचारी संख्या ही आरोग्य व ग्रामपंचायत विभागाची आहे. त्यामुळे या रोष्टर मंजुरीला विलंब होण्याची शक्यता आहे.

जिल्‍हा परिषदेकडे अनेक कर्मचारी बदलीने येत असतात. या कर्मचाऱ्यां‍ची मूळ आस्‍थापना ज्या जिल्‍ह्यात आहे, तेथून त्यांच्या नियुक्‍तीची माहिती मागवण्यात येणार आहे. या कामासाठीही विलंब होणार आहे. त्यामुळे रोष्टर तपासणीत अडचणी येण्याची शक्यता आहे.

जिल्‍हा परिषद नोकरभरतीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कागदपत्रे संकलित केली जात आहेत. नोकरभरतीसाठी कंपनी निश्‍चित करण्यात आली. आता या कंपनीबरोबर करार करणे बाकी आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येत आहे. रोष्टर तपासणीबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या. यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे.

- मनीषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com