बेळगावात घरीच उपचार घेऊन तब्बल एवढे जण झाले कोरोनामुक्त 

781 people corona negative in belgaum
781 people corona negative in belgaum

बेळगाव - आरोग्य विभागाच्या "होम केअर' सुविधेंतर्गत बेळगाव शहरासह तालुक्‍यातील तब्बल 1,525 कोरोनाबाधितांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. त्यापैकी 781 जण कोरोनामुक्‍त झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. त्यामुळे, होम आयसोलेशन करून घरीच उपचार देण्याची आरोग्य विभागाची योजना बेळगावात यशस्वी झाल्याचे दिसत आहे. 

तीन आठवड्यांपूर्वी आरोग्य विभागाने होम आयसोलेशन सुरु केले. प्रारंभी मोजक्‍याच कोरोनाबाधितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. विशेषता अँटिजेन चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या व कोरोनाची लक्षणे नसलेल्यांना घरीच उपचार देण्यास सुरवात झाली. घरी उपचार दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते कोरोनामुक्त झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे आता ही संख्या 1525 पर्यंत पोहोचली आहे. या सर्वांना आरोग्य विभागाकडून घरी औषधोपचार दिला जात आहे. घरचे भोजन, नियमित औषधोपचार यामुळे 781 जण कोरोनामुक्तही झाले आहेत. 

कोरोनाबाधीतांवर, त्यांच्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार घालण्याचा प्रकार काही ठिकाणी घडला. बाधीतांच्या संपर्कात आलेल्यांना, परराज्यातून आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल, लॉज किंवा वसतीगृहांचा ताबा घेण्यास विरोध झाला. पण आता कोरोनाबाधीतांना त्यांच्याच घरी ठेवून उपचार दिले जात आहेत. त्याला आता विरोध होत नसल्याचे चित्र शहर व तालुक्‍यात पहावयास मिळत आहे. कोरोनाबाधीतांवरील औषधोपचार, त्यांना द्यावा लागणारा अल्पोपहार, भोजन व अन्य सुविधांमुळे आरोग्य यंत्रणेवर आलेला ताणही यामुळे कमी झाला आहे. होम आयसोलेशनचा निर्णय घेताना बाधीतांमध्ये लक्षणे नाहीत किंवा असली तरी ती सौम्य आहेत का? याची पडताळणी केली जाते. त्यानंतरच त्याना घरी ठेवून उपचार दिले जातात. कर्नाटकात सर्वात आधी बंगळूर शहरात हा प्रयोग सुरू झाला. त्यानंतर बेळगाव शहरात सुरू झाला. आता याला चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे. अर्थात होम आयसोलेशनसाठी घरात बाधीत व्यक्तीला ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली, स्वच्छतागृहाची व्यवस्था असणे आवश्‍यक आहे. अशी सुविधा असेल तरच संबंधितांना घरी ठेवून उपचार दिले जात आहेत. 

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव तालुक्‍यातील कोरोनाबाधीतांची संख्या 3730 इतकी झाली आहे. 2 हजार 411 बाधीत आतापर्यंत बरे होवून घरी गेले आहेत. बेळगाव शहर व तालुक्‍यातील बाधीतांच्या मृत्यूची संख्या मात्र अन्य तालुक्‍यांच्या तुलनेत जास्त आहे. आतापर्यंत शहर व तालुक्‍यातील 127 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ज्या बाधीतांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे आहेत, त्यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. 


कोरोनाबाधीतांवर घरीच उपचार देण्याच्या आरोग्य विभागाच्या निर्णयाला यश मिळाले आहे. लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधीतांची संख्या जास्त आहे. त्यातील बहुतेक जणांना घरीच उपचार दिले जात आहेत.

-डॉ. संजय डूमगोळ, आरोग्याधिकारी


संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com