

Ambabai Temple Navratri
esakal
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, दर्शन रांगेतील मंडप, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा आणि सुरक्षाव्यवस्थेची कामे वेगाने सुरू आहेत. मंदिराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ओवऱ्यांच्या लाकडी दरवाजांवर आकर्षक नक्षीकामही करण्यात येत आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक कोल्हापुरात येतात. गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांची सुरक्षितता आणि सुविधा यावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने भर दिला आहे. यंदा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुरक्षाविषयक माहिती अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र सर्व्हर खरेदीची तयारीही सुरू आहे. नवरात्रोत्सवाच्या तयारीचा अंतिम आढावा घेण्यासाठी सोमवारी (ता. ५) जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापक बैठक होणार आहे.
मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ओवऱ्यांच्या लाकडी दरवाजांना आकर्षक रूप देण्याचे काम सुरू आहे. खंडोबा मंदिराच्या ओवरीचा दरवाजा आकर्षक तयार केला असून, त्याच धर्तीवर सुमारे ४० हून अधिक ओवऱ्यांच्या लाकडी दरवाजांवर कलात्मक नक्षीकाम केले जाणार आहे.
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दर्शनरांगेत मंडप उभारण्यात येत आहे. स्वयंसेवकांच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंदिर परिसरात तीन ठिकाणी नियमित पाण्याची व्यवस्था केली जाणार असून, वैद्यकीय सेवाही राहणार आहे.
नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. देवस्थान समितीने यंदा दोन लाख लाडू तयार करण्याचे नियोजन केले आहे. कळंबा कारागृहातील कैद्यांमार्फत हे लाडू तयार करण्यात येणार असून, त्यासाठीची तयारी सुरू आहे.
मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता सोमवारी (ता. ५) करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या दिवशी देवीचे नियमित दर्शन बंद राहणार आहे. मात्र, भाविकांना उत्सवमूर्तीचे दर्शन घेता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.