छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट; राजकीय नेत्यांनी कोल्हापुरातील जनतेला केलं 'हे' आवाहन I Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satej Patil Rajesh Kshirsagar Kolhapur

आक्षेपार्ह स्टेटस ठेवून भावना दुखावणे हे निंदनीय आहे. सामाजिक सलोख्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.

Kolhapur : छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट; राजकीय नेत्यांनी कोल्हापुरातील जनतेला केलं 'हे' आवाहन

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पराक्रमाचा मोठा इतिहास या शहराला आहे. समतेचा वारसा संपूर्ण देशाला देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे (Shahu Maharaj) हे कोल्हापूर शहर. या शहरात निर्माण होणारा तणाव सलोख्याच्या परंपरेला छेद देणारा आहे, अशावेळी कोल्हापूरची ऐक्याची, सलोख्याची परंपरा जपण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.

त्यासाठीच कोल्हापुरातील (Kolhapur) विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शहरात सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. मोबाईल स्टेटसवरील आक्षेपार्ह पोस्टवरून शहरात मंगळवारी मोठा तणाव निर्माण झाला. यापूर्वीही असे प्रकार घडल्यानंतर विविध घटकांतील ज्येष्ठांनी त्यामध्ये समेट करण्याचा प्रयत्न केला आहे, आताही तीच वेळ आली आहे. कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर विविध पक्ष, संघटनांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता, त्यांनी कोल्हापुरात सलोखा ठेवण्याचे आवाहन केले.

आक्षेपार्ह स्टेटस लावण्याऱ्या संबंधित युवकाच्या कृत्याचा मी निषेध करतो. या प्रकरणी तातडीने कडक कारवाई करण्याची विनंती जिल्हा पोलिस अधीक्षकांना केली आहे. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीमध्ये सामाजिक सलोखा आणि एकमेकांशी सौहार्दाचे संबंध आपण सर्वांनी कायम ठेवूया. भविष्यकाळात अशा घटना घडणार नाहीत. यासाठी सर्वांना एकत्रित बोलावून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बैठक घ्यावी. सामंजस्याची भूमिका घेऊन आपण सारेच पुढे जाऊया.

- सतेज पाटील, आमदार

आज घडलेला प्रकार राजर्षी शाहूंच्या करवीरनगरीला मुळीच शोभणारा नाही. ज्यांनी कोणी अशा स्वरूपातील स्टेटस ठेवला, त्यांनी भावना भडकाविण्याचे काम करू नये. प्रार्थनास्थळांवर हल्ला करणे देखील चुकीचे आहे. त्यामुळे दोन्ही समाजांनी शांतता राखावी. शहरात यापुढे दंगा होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी.

- राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत झालेला हा प्रकार दुर्देवी आहे. शांतता बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. काहींचा देशभरात अशा प्रकारे तणाव निर्माण करण्याचा अजेंडा आहे. कोल्हापुरातही तोच प्रयत्न सुरू आहे. यातून राजकीय पोळी भाजून घेऊ नये.

- संजय पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट

आक्षेपार्ह स्टेटस ठेवून भावना दुखावणे हे निंदनीय आहे. सामाजिक सलोख्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. भविष्यात सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी.

- राहुल चिकोडे, जिल्हाध्यक्ष भाजप

संबंधितांवर तत्काळ कडक कारवाई करावी. त्यांना लवकर जामीन मिळू नये, यासाठी प्रयत्न व्हावेत. तरच असे प्रकार यापुढे होणार नाहीत. काही समाजकंटकांमुळे शहर वेठीला धरले जात आहे. असा प्रकार करणाऱ्यांवर पोलिसांनी नजर ठेवून कारवाई करावी.

-गणी आजरेकर, चेअरमन, मुस्लिम बोर्डिंग