
Shaktipeeth Highway Protest : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी आज शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने पुणे-बंगळूर महामार्गावर तब्बल तीन तास महामार्ग रोको आंदोलन केले. ‘शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे’, ‘या सरकारचं करायचं काय?’, ‘महायुती सरकारचा धिक्कार असो’, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा निषेध असो,’ आदी घोषणा देत आंदोलक शेतकऱ्यांनी शिरोलीजवळील पंचगंगा पुलासह परिसर दणाणून सोडला. याचवेळी पाच कार्यकर्त्यांनी पंचगंगेत उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला; पण वेळीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.