

Chandgad Elephant Movement
esakal
चंदगड : सहा महिन्यांहून अधिक काळ दोडामार्ग आणि आजरा परिसरात वावरल्यानंतर अण्णा आणि राजा हे दोन हत्ती आता चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात दाखल झाले आहेत. सुगीच्या तोंडावरच हत्तींचा शिवारातील वावर सुरू झाल्याने पिके कशी सुरक्षितपणे घरात आणायची, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कळसगादे परिसरात अण्णा, तर जांबरे-उमगाव परिसरात राजा हत्तीचा वावर आहे.
चंदगडच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. पंधरा दिवसांहून अधिक काळ पावसाने ओढ दिल्याने भात पिकाला पाण्याची गरज निर्माण झाली आहे. काही शेतकरी वीज पंपाच्या साह्याने, तर काही ठिकाणी पाटाच्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही भागात हळवे भात कापणीला आले आहे. भुईमूग, नाचणी आणि इतर कडधान्येही परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. उसाचे पीकही जोमदार वाढले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांची धावपळ वाढणार आहे.
अशातच दोडामार्ग भागातून अन्न हत्तीचा, तर आजरा हद्दीतून राजा हत्तींचा शिवारात प्रवेश झाल्याने शेतकऱ्याची धावपळ अधिकच वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून हत्तींचे आगमन पिकांच्या महत्त्वाच्या टप्प्यात होत असल्याने नुकसान टाळण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाणे, कापणीची कामे करणे किंवा पिकांची राखण करणेही धोक्याचे ठरत आहे.
वन विभागाने हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले असून, हाकारा पथके तैनात केली आहेत. संभाव्य मार्गांवर कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली आहे. गावोगावी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे वनपाल भारत खुटाळे यांनी सांगितले. मात्र, हत्तींचा वावर आणि सुगीची वेळ यांचा मेळ साधताना शेतकऱ्यांसमोर पीक कसे वाचवायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.