चंदगड : रोजचा दिवस झगडण्याचा जीवावर बेतणारा.

रणरणत्या उन्हात तवंदी घाट पार केला...काळभैरी
 कलिवडेचा धनगरवाडा
कलिवडेचा धनगरवाडा sakal

चंदगड : तालुक्यातील कलिवडेचा धनगरवाडा दोन वर्षांपूर्वी पाहिलेला.अस्वलाने हल्ला केलेल्या सोनूबाई जानकर तेव्हा भेटल्या होत्या. कोरोनाच्या संचारबंदीने कलिवड्याची वाट अडवली...मात्र जंगली प्राण्यांचा वावर सुसाट वाढला... हत्ती, बिबट्या, अस्वल, रानडुक्करं थेट वस्तीत आले....पिकांचे नुकसान तर केलेच; पण... ग्रामस्थांवरही हल्ले केले... तेथलं जगणं ढवळून निघालं... उत्सुकता होती सध्या तेथे काय चाललंय हे जाणून घेण्याची...आणि त्या ऊर्मीतूनच रणरणत्या उन्हात कलिवडे गाठलं...अनुभवलं...संवाद साधला...येणारा दिवस नवे घेऊन येत असल्याचा आणि अनेकदा जीवावर बेतत असल्याचे समजले...जगणं कठीणच बनल्याचं जाणवलं.

रणरणत्या उन्हात तवंदी घाट पार केला...काळभैरी, गडहिंग्लज, नेसरी, नागणवाडीमार्गे पाटणे फाटा गाठला... रस्त्यावरून निघालेल्या विद्यार्थ्याने हात दाखवला...त्याला गाडीवर घेतले आणि पहिला प्रश्‍न टाकला..‘कुठं जाणार? ,‘‘जंगमहट्टी फाटा...’ ‘‘तानाजी शेळके कोठे राहतात?’’ मी चौकशी सुरू केली. ‘त्यो धनगरवाड्यात राहतोय. गावच्या ग्रामपंचायतीत असतोय. तिथं हाय कामाला...आता घरला गेलाय का बघाय पायजे,’’ येतोस का विचारले तर...नकारघंटा वाजवत तानाजीचा पत्ता सांगितला... जंगमहट्टीतला कबडीपटू अंकुश गावडे भेटला आणि तो सोबत यायला तयार झाला...धूळ उडवत आम्ही धनगरवाड्याच्या दिशेने सुटलो. ‘‘सायेब, लय हाल हाईत धनगरवाड्यातल्या लोकांचं. जंगली प्राणी येत्यात... तानाजी पाणी सोडाय गेल्ता. तवा त्येच्यावर अस्वलानं हल्ला केल्ता. त्यो झाडावर चढला म्हणून वाचला,’’ अंकुश माहिती पुरवू लागला...दुचाकीवरून आलेल्या तानाजीची वाटेतच भेट झाली...त्यालाच भेटायला आलो हे समजल्यावर तो तेथूनच गावच्या दिशेनं मागे फिरला.

अस्वलाच्या हल्ल्यानं झाडावर चढल्यानी...!

घरी पोहोचलो...तानाजी चंदगडी भाषेत बोलू लागला...‘‘सकाळी साडेनऊला मी गेल्यानी. अस्वलानं हल्ला केल्यावर झाडावर चढल्यानी. मग अर्धा तास झाडावरच. फोन केला... दोन कामगार यीऊन मला वाचिवल्यानी...’ अंगावर काटा आणणारा हा अनुभव... पत्नी जयश्रीही सांगू लागल्या..‘‘यांचा काका दादू भागोजी शेळकेचा अस्वलानं पायच फाडला. दोन वर्षांपूर्वी हे घडलं. दोन महिने अंथरुणावर हुता. वनखात्यानं पंचनामा करून २० हजार रुपये दिल्तं.’’ ‘‘गावात बावीस घर. १३३ लोक राहत्यात. मोलमजुरीच करताव. शेती न्हाई आमाला,’’ अंकुशने सांगून टाकले. ‘‘गावात बुजुर्ग कोण?’’ विचारल्यावर शेजारील घराकडे बोट दाखवले. तानाजीच्या डाव्या खांद्यावर अस्वलानं ओरबडलेल्या नख्यांचे घाव भरले असले तरी व्रण कायम होते...तेथून दादू शेळकेंच्या अंगणात गेलो....

शिक्षणाची वाट बिकटच...

नव्वदीतले शेळके अंगणातल्या कट्ट्यावर बसलेले. पांढरा सदरा, हाफ चड्डी, डोक्याला मुंडासे. नमस्कार-चमत्कार झाला...शेळके बोलू लागले... ‘‘आमच्या लय डुई (पिढ्या) हिथंच राह्यल्या. आमच्याव कधीच जनावरानं हल्ला केला न्हाई. आताच कराल्यात. आधीतर जंगलात लय जनावरं हुती. ती कधी जंगल सोडणार ते आमाल माहीत. मग आमी तिकडं फिरकत नव्हतो.’’ त्यांचा मुलगा गंगाराम व रामू सरपंच होते, हे सांगायला ते विसरले नाहीत. पुन्हा तानाजीचे घर गाठले आणि जंगमहट्टीकडे मार्गस्थ झालो. रस्त्याच्या दुतर्फा दाट जंगल... गावात शाळा चौथीपर्यंत. पुढच्या शिक्षणासाठी धनगरवाड्यातून गावात तीन किलोमीटर चालत जावं लागतं. चालतच जावं लागतं...जाण्यासाठी इतर सुविधा नाही...जाताना सरिता शेळके भेटली. ‘‘रोज चालत शाळेला जात्यानी,’’ हे एक वाक्य बोलून तिने चालण्याचा वेग वाढविला. गावात पोचलो. भरमाण्णा जाधव यांची भेट घेतली. ‘‘दोन महिन्यांपूर्वी हत्ती शेतात आल्यानी. पीक नुकसान करून गेल्यानी. ऊस मोडून खाल्यानी. फारीस्ट खात्याच्या लोकांनी पंचनामे केल्यानी. नुकसानभरपाई अजून नाही मिळाल्यानी.’’ त्यांनी व्यथा मांडली.

कलिवडेचा धनगरवाडा अन् भीतीचे काहूर

अंकुशचा जेवणाचा आग्रह टाळून निरोप घेतला. जंगमहट्टीच्या रस्त्यावर लहान मुलांचा व्यायाम सुरू होता. त्यांना भेटून कलिवडेचा धनगरवाडा गाठला...कलानंदिगडाच्या पायथ्याला हा धनगरवाडा. दोन वर्षांपूर्वी कलिवडे गावातून चालत गेलो होतो... यावेळी रस्त्याचा ठावठिकाणा विचारत गाडीचा वेग वाढवला... खाच-खळग्यांतून गाडी नेताना अंधाराची चाहूल लागली.... सहा वाजून गेले...भीती झटकून टाकत...गाडीचा वेग कमी न करता थेट धनगरवाडा गाठला आणि सुटकेचा नि:श्वास टाकला. मित्र बाबूराव झोरेच्या आजीनी केलेला फक्कड चहाचा आनंद घेतला...आणि धावू जानकरांच्या अंगणात पाठ टेकली. त्यांच्या सोबत चर्चा सुरू झाली, ‘‘मुख्यमंत्री निधीतनं पैशे मिळालं न्हाईती. मुंबैला जाऊन आलाव आमी,’’ धावूंनी खंत व्यक्त केली. सोनूबाईंशी बोलायचं होतं...पण त्यांना यायला वेळ झाला...मग निरोप घेतला... गावातून परतताना वाटेत म्हशी घेऊन परतणाऱ्या सोनूबाई भेटल्या. दोन वर्षांपूर्वी अस्वलाच्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी होत्या...

३९ गुरा-ढोरांवर, तर सहा माणसांवर हल्ले

गावातून चंदगड गाठलं. स्टॅंडपासून जवळ असलेल्या शिक्षक कॉलनीत निवारा शोधला...दुसऱ्या दिवशी राऊंड ऑफिसर दत्ता पाटील यांच्याशी बोलणे झाले. पाटणे फाट्याहून कामानिमित्त चंदगडला येणार होते. चंदगडहून काजिर्णेत मित्राला भेटून परतलो. टपरीवर चहा घेऊन रवळनाथ मंदिराकडे वळलो, ‘‘चंदगडमध्ये तीस हजार हेक्टर क्षेत्र जंगलाचे आहे. त्याचे दोन भाग पडतात. हत्ती व गवे पिकांचे नुकसान करतात. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देतो. पाटणे व चंदगड या दोन्ही कार्यालयांकडून पंचनामे होतात. पाटणे कार्यालयाकडून हत्ती व गव्यांकडून झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईचा पाच वर्षांचा आकडा आमच्याकडे आहे. २०१६-१७ ला ६७८ प्रकरणांत २३ लाख ८१ हजार ३३० रुपये, २०१७-१८ ला ६३३ प्रकरणांत २० लाख ६३ हजार ४६२, २०१८-१९ ला ५२७ प्रकरणांत १४ लाख ९५ हजार ९६, २०१९-२० ला ५१८ प्रकरणांत १६ लाख ३३ हजार ६३, तर २०२०-२१ ला ६८४ प्रकरणांत २० लाख ११ हजार ८९२ नुकसानभरपाई देण्यात आली. हा आकडा पाहून डोळे गरगरले. याचा सरळ अर्थ जंगली प्राण्यांचा उपद्रव मानवी वस्तीत किती होतोय, हे स्पष्ट झाले.

धनगर बांधवांकडून जागेसाठी दावे

इंडियन फॉरेस्ट अॅक्ट १९२७ चा. स्वातंत्र्यानंतर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अस्तित्वात आला. वनखात्याच्या अखत्यारीत जमिनीवर डांबरी रस्ता करण्यास परवानगी दिली जात नाही. पारंपरिक आदिवासी कायदा-२००६ नुसार धनगर बांधव जागेसाठी दावे करत आहेत. अनेक दावे मंजूर झाले आहेत. त्यांनी सार्वजनिक कामासाठी जागेची मागणी केल्यास १०० गुंठे जागा देण्यात येते. तसा ठराव ग्रामपंचायतीने करावा लागतो, वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे सांगत होते. त्यांची भेट होऊ शकली नसली तरी मोबाईलद्वारे त्यांच्याशी चर्चा झाली. नुकसानभरपाई दिली जात असली तरी धनगरांच्या संरक्षणाचे काय, हा प्रश्न मनात तरळला. ‘‘आमच्यापेक्षा चांगली माहिती धनगरांनाच असते. प्राण्याच्या पायाचा ठसा पाहून तेच त्या प्राण्याचे नाव सांगतात,’’ पाटील यांनी धनगर बांधवांच्या ज्ञानाचा उलगडा केला. बाकी त्यांच्या जीवावर बेतणाऱ्या रोजच्या दिवसाचा विचार करत कोल्हापूरच्या दिशेने प्रवास सुरू केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com