टॉपचे राजकीय नेते अंडरवर्ल्डच्या संपर्कात; चंद्रकांत पाटलांचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

याबाबतची विस्तृत माहिती व्होरा कमीशनच्या अहवालात आहे. हा अहवाल खुला केला पाहिजे.

टॉपचे राजकीय नेते अंडरवर्ल्डच्या संपर्कात; चंद्रकांत पाटलांचा आरोप

कोल्हापूर : राज्यातील टॉपचे राजकीय नेते अंडरवर्ल्डच्या संपर्कात आहेत. १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटात त्यांचा सहभाग आहे. याबाबतची सविस्तर माहिती व्होरा कमिशनचा अहवाल आहे. म्हणूनच हा अहवाल खुला करून त्यात उल्लेख असलेल्या राजकीय नेत्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. राज्य सरकारच्या पेट्रोल-डिझेल दर वाढ कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाटील यांनी निदर्शने केली यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा: सांगलीत उसाचे ट्रॅक्टर पेटवले, स्वाभिमानी आक्रमक

नबाब मलिक यांच्या आरोपावर उत्तर देताना ते म्हणाले, 'राज्यातील टॉपचे राजकीय नेते अंडरवर्ल्डच्या संपर्कात आहेत. १९९३ मध्ये जे बाँम्बस्फोट झाले त्यामध्ये या टॉपच्या नेत्यांचा सहभाग होता. याबाबतची विस्तृत माहिती व्होरा कमीशनच्या अहवालात आहे. हा अहवाल खुला केला पाहिजे. म्हणजे या नेत्यांचे खरे चेहरे समोर येतील. अहवाल खुला करून यामध्ये ज्यांची नावे आहेत. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. नबाब मलिकांनी ‘टाडा’मधील आरोपींची मालमत्ता खरेदी केली. कारण ती जप्त होणार होती. ही एक प्रकारे त्या गुन्हेगारांना मदत केल्यासारखेच आहे. त्यामुळे मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहीजे. मलिक भाजप नेत्यांवर बेछूट आणि खोटे आरोप करत आहेत. राज्यात सरकारही त्यांचेच आहे आणि ते स्वतः मंत्री आहेत त्यांनी आमची चौकशी करावी.'

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मंत्री नबाब मलिक यांनी ‘टाडा’मधील आरोपींना मदत केली आहे. त्यामुळे त्यांना एन.आय.ए.ने ताब्यात घेतले पाहिजे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. मलिक यांनी फडणवीस यांच्यावर बेछुट आरोप केले आहेत. त्यांनी मलिकांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा.'

हेही वाचा: काँग्रेस आमदाराच्या मुलाची आत्महत्या; सुसाइड नोट सापडली

loading image
go to top