
कोल्हापूर : ट्रॅक्टरचालक परवान्यांसाठी आतामोटार स्कूलच्या प्रमाणपत्राची अट
कोल्हापूर : ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना घेण्यासाठीही आता मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रमाणपत्रांची अट घातली आहे. संगणक प्रणालीत प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रक्रिया पुढे जात नाही. त्यामुळे शेतकरी मुलांना ट्रेनिंग स्कूलच्या प्रमाणपत्राची गरज आहे. प्रत्यक्षात चारचाकीसाठी स्कूलची व्यवस्था आहे. मात्र, ट्रॅक्टरसाठी अशी व्यवस्थाच नसल्याने शेतकरी मुलांना परवाना मिळणे मुश्कील झाले आहे.
हेही वाचा: UP Election : मालेगाव स्फोटातील आरोपीची उमेदवारी 'जदयू'कडून मागे!
एखाद्याला मोटार चालविण्यास शिकायची असल्यास त्याच्यासाठी मोटार ड्रायव्हिंग स्कूलची व्यवस्था आहे. यात प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी दोघेही मोटारीत बसू शकतात. चालकाला प्रशिक्षण देता येते. त्यासाठी मोटारीत खास दोन ब्रेक, दोन ॲक्सिलेटर, दोन क्लजची व्यवस्था असते. परिणामी, अपघात होण्यापासून टाळता येते. मोटार चालविण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेता येते. मात्र, अशी व्यवस्था ट्रॅक्टर प्रशिक्षणासाठी नाही. ट्रॅक्टर शिकविण्यासाठी प्रशिक्षणार्थीबरोबर प्रशिक्षक एकत्र बसूच शकत नाहीत. मोटारीसारखी समांतर व्यवस्था नाही. त्यामुळे मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्येही ट्रॅक्टर शिकविण्याची व्यवस्था नाही. यामुळे प्रमाणपत्र मिळविणे दूरची गोष्ट आहे. अनेक तरुणांनी शेतात ट्रॅक्टर चालविला आहे. तो उत्कृष्टपणे चालविता येतो. तरीही त्यांना अधिकृत परवाना मिळणे मुश्कील झाले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आडमुठ्या धोरणामुळे अनेक शेतकरी कुटुंबातील तरुणांना परवानाविना ट्रॅक्टर चालवावा लागत आहे. तातडीने ही व्यवस्था बदलावी, अन्यथा यासाठीही आंदोलन करावे लागेल, अशी मानसिकता तरुणांची झाली आहे.
हेही वाचा: Punjab Election 2022 : माजी उपमुख्यमंत्री बादल यांचे मुख्यमंत्री चन्नी यांना आव्हान
ट्रॅक्टर चालविण्यासाठी मोटार ड्रायव्हिंग स्कूलची गरज नाही. तरुणांची चाचणी घेऊन त्यांना परवाना द्यावा. स्कूलमध्ये ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाच नाही. त्यांच्याकडून कसले प्रमाणपत्र मागतात, हेच कळत नाही. याबाबत परिवहन आयुक्तांकडेही दाद मागितली आहे. ही अट रद्द व्हावी. अवजड वाहतुकीचा परवाना मिळाल्यावर नूतनीकरणावेळी पुन्हा मोटार स्कूलचे प्रमाणपत्र मागितले जाते, हे चुकीचे आहे. तीही अट रद्द करावी.
- सुभाष जाधव, अध्यक्ष, लॉरी ऑपरेटरर्स असोसिएशन
ट्रॅक्टर चालविण्याच्या परवान्यासाठी मोटार स्कूलच्या प्रमाणपत्राची अट संगणक प्रणालीतच आहे. त्याशिवाय पुढील प्रक्रिया होत नाही. ही अट काढून घ्यावी, अशी मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे. मात्र, अद्याप पूर्तता न झाल्याने सध्या तरुणांना ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना देण्यावर मर्यादा येत आहेत. यात लवकरच सुधारणा होतील.
- रोहित काटकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर
Web Title: Condition Of Motar School Certificate For Tractor Driver License
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..