
एसटीच्या खबरदारीत प्रवाशांची बेफिकिरी; कोरोनाची भीती, पण गावी जाण्याची आसही
video : त्याला काय हुतंय... लेकीच्या गावाला जायच तर एसटीनेच
कोल्हापूर : इचलकरंजीहून कोल्हापूरला जाणारी एसटी, फलाट नंबर १७ वर, अशी उद्घोषणा होताच चार-पाच प्रवासी एसटीकडे धावत आले. तोंडाचा मास्क, हातातली बॅग सावरत लगबगीने गाडीत चढू लागले. तोवर कंडक्टरने हाक दिली, ‘ओ! साहेब, मी बेल मारल्याशिवाय गाडी हालत नाही.’ तोवर एका प्रवाशाने मास्क खाली ओढला. काही जण एका सीटवर दोघे-दोघे बसण्याच्या प्रयत्नात होते, कंडक्टरने त्यांना लगेच ताकीद दिली. कंडेक्टर रोज सांगतात, पण लोकच ऐकत नाहीत, त्यावर हे रोजचंच हाय बघा, अशी व्यथाही कंडेक्टरने मांडली.
एसटीत १३ प्रवासी होते. कंडक्टर म्हणाले, ‘अजून दोन आले की निघू.’’ १५ प्रवासी होताच ड्रायव्हरने स्टार्टर मारला. कोल्हापूरकडे परतीचा प्रवास सुरू झाला. स्थानकातून एसटी जरा पुढे येताच ड्रायव्हरने ब्रेक मारला. वयाची साठी ओलांडलेली आजी समोरच्या सीटवर बसलेल्या महिलेजवळ येऊन बसली. ‘आजी एका सीटवर एक जण बसायचं. मागच्या सीटवर बसा नाहीतर मी जातो मागे’ मी असे म्हणताच आजी मात्र चिडली. मास्क काढत म्हणाली, ‘‘काय माणुसकीच राहिली नाही. कसला आलाय ह्यो कोरोना, कधी जातोय काय माहीत.’’ असे म्हणत चरफडतच मागच्या सीटवर जाऊन बसली.
एसटीने प्रवासात घालून दिलेले नियम टाळण्याचा प्रयत्न प्रवाशांकडून होत आहे. हे लक्षात येताच मागून हसण्याचा आवाज आला. वळून पाहिलं तर दोन तरुण मास्क काढून एकाच सीटवर बसत गप्पा मारत होते. काही प्रवासी त्यांच्याकडे पाहत होते. यांनी मात्र सोशल डिस्टंन्सला कधी तिलांजली दिली होती. तोवर पुढच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने गुटख्याची पिचकारी खिडकीतून मारली. ‘ओ! दादा काय हे’ असे दुसऱ्या एका प्रवाशाने म्हणताच ‘सॉरी’ म्हणत त्याने ते निभावून नेलं. कोरोनाचा विषाणू खोकण्यातून, शिंकण्यातून अधिक प्रसारित होतो. थुंकीतून तर विषाणूंचा स्फोटच होतो. या गोष्टी लोकांपर्यत पोहचवून ही लोक बेफिकीरपणे वागत आहेत, हे दिसून आले.
हेही वाचा- कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील गाड्यांचा 4000 नंबर झाला सुपरहिट
त्याला काय हुतंय...
एसटी कबनूरमध्ये येताच चार जण गाडीत चढले. जागा पाहण्यासाठी त्यांनी नजर मारली. तोवर शेजारचे दोन प्रवासी हात देत म्हणाले, ‘‘अहो! बसा इथंच, त्याला काय हुतंय? सगळ्यांना कोरोना असतोयच होय, या बसा’ त्या चार जणांनी त्या दोन सीटवर बस्तान मांडले. कंटक्टरांनी पाहिले आणि दुर्लक्ष केले. कोल्हापुरात पोचल्यावर त्यांना विचारले तुम्ही, सूचना करीत नाही का? ज्येष्ठ माणसांना प्रवास नाकारावा तर फुल तिकीट घ्या, पण येऊ द्या, असं म्हणतात. कुटुंब असेल तर एकत्र बसायला परवानगी आहे, पण मास्क, सोशल डिस्टन्स ठेवून, धूम्रपान न करणे, या गोष्टी प्रवाशांनी पाळायला हव्यात.’’
लेकीच्या गावाला जायला एसटीच पाहिजे...
एसटी कोल्हापुरात पोचताच एक आजोबा गडबडीने खाली उतरत होते. त्यांना मी विचारताच ते म्हणाले, ‘लेकीकडे निघालोय. सायंकाळपर्यंत परत गावी जायचंय.’ मी त्यांना विचारले, ‘कोरोनात कशाला जाताय?’ ‘कोरोना होईल अशी मनात भीती हायच, पण कोरोना आल्यापासून लेक गावी आली नाही. मीबी गेलो नाही. खासगी गाडीतून जावं तर तेवढी परिस्थिती नाही. म्हणून एसटीच परवडत्या बघा.’ असे ते म्हणाले.
संपादन - अर्चना बनगे
Web Title: Covid 19 Story Common People Human Interest Story Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..