
सहकाऱ्यांनीच केला घात; 20 हजारांसाठी चालकाचा खून, दोघांना अटक
राशिवडे बुद्रुक/ कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यातील शेळप- बांबर दरम्यान एका टँकरमध्येच चालकाचा दोघा सहकाऱ्यांनी खून केला. तरलोकसिंग धरमसिंग (वय ५४, पंजाब) असे मृत व्यक्तीचे नाव असून खून करुन पसार झालेल्या दोघा संशयित आरोपींना पोलिसांनी २४ तासांत दिल्लीतून अटक केली. कमलजीत सुदेशकुमार सिंग (वय ५३,रा.मंडवाल, पटीयाला, पंजाब) आणि बलविंदर सादा सिंग (२५, रा.खानपूर, खुर्द, पटीयाला, भेडवाल) अशी त्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. पैशावरून त्याच्या सहकाऱ्यांनीच हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. (Crime news)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राधानगरी फोंडा राज्यमार्गावर एक टँकर गेली तीन दिवस रस्त्याच्या बाजूला उभा होता. (Accident news) अभयारण्यातील निर्जनस्थळी नादुरुस्त वाहने लावली जातात, यामुळे लोक याकडे दुर्लक्ष करतात. शेळप -बांबर दरम्यानच्या परिसरात चालकाने टँकर (क्र. पीबी-०६-बीए ७६२६) बाजूला लावल्याचे जी.पी.आर.एस. सिस्टीमव्दारे टँकरमालकाला समजले. त्यानी राधानगरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता चालकाचा केबीनमध्ये खून झाल्याचे दिसून आले. मृतदेह तीन दिवस केबीनमध्येच होता. चालकाच्या डोक्यावर, कानामागे वार झाल्याचे दिसून आले. सीसीटीव्हीत हा टँकर शुक्रवारी या मार्गावरून गेल्याचे व चालकाने सहकाऱ्यांसोबत एका ठिकाणी एटीएमवर पैसे काढल्याचे दिसून आले आहे. यातून त्याच रात्री अज्ञातानी हा खून केला असल्याचा पोलिसांना संशय आला.
हेही वाचा: मोठा दिलासा! रुग्ण संख्येत घट; काल 2 लाख 55 हजार नवे रुग्ण
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी स्वतंत्र पथक तयार करून तपास सुरू केला. टॅंकर हा स्पिरिटने भरलेला असल्याने तो कोठून आला. त्याचा मार्ग, पेट्रोल भरण्याचे ठिकाण व टॅंकर मध्ये मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे तांत्रिक पद्धतीने तपास केला. टॅंकर चालकाच्या सोबत असलेल्या दोघांनीच केला असल्याचा संशय बळावला. अधिक तपास केला असता कमलजीत आणि बलविंदर हे दोघे गुन्हा करून दिल्ली येथे पळून गेल्याची माहिती पुढे आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले आणि उत्कर्ष वझे, उपनिरीक्षक विनायक सपाटे यांचे पथक दिल्लीत पाठवून तेथे रेल्वेस्थानकावर सापळा रचून संशयित आरोपींना अटक केली.
२० हजारांसाठी मारले
टँकर राजपुरा (पंजाब) येथून गोवा येथे निघाला होता. त्यावेळी संशयित आरोपी कमलजितसिंह हा त्याच्या सोबत होता. तरलोकसिंहकडे रोख २० हजार होते. ते पैसे काढून घेण्यासाठी साथीदार बलविंदरसिंग यास त्याने सातारा येथे बोलवून तेथून पुढे गोव्याकडे जात असताना टॅंकर शेळप-बांबर (ता. राधानगरी) येथे आल्यावर खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा: वर्धा अपघात : PM मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत
Web Title: Crime Case In Kolhapur Truck Driver Dead Body Found In Radhanagari Area
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..