कोल्हापुरात राजकीय समीकरणं बदलणार; विधानपरिषदेचे पडसाद उमटण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

विधान परिषदेचे पडसादही या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात राजकीय समीकरणं बदलणार?

कोल्हापूर : विधान परिषदेचे रणांगण सुरू असतानाच जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. विधान परिषदेनंतर बँकेची निवडणूक होईल अशी शक्यता बाळगून असलेल्या जिल्ह्यातील नेतृत्‍वाचा यानिमित्ताने कस लागणार आहे. परिणामी विधान परिषदेचे पडसादही या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेचे नेतृत्‍व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ करतात.

गेल्या सहा वर्षात मुश्रीफ यांनी बँकेला प्रगतीपथावर नेले आहे. या जोरावरच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असताना किमान सहा तालुक्यातील विकास सोसायटी गटातच काहींनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. त्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हेही या निवडणुकीत ताकदीने उतरण्याची शक्यता आहे. विकास सोसायटी गटात नसेना पण इतर गटाताली काही जागांवर तुल्यबळ उमेदवार देऊन त्या गटातील विद्यमान संचालकांना शह देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

हेही वाचा: पोटनिवडणूक लढणार की बिनविरोध? काँग्रेस-भाजप निर्णयाकडे लक्ष

विधान परिषद निवडणुकीत ‘जनसुराज्य’चे आमदार विनय कोरे व बँकेचे माजी संचालक प्रकाश आवाडे यांनी भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या मागे ताकद लावली आहे. बँकेत कोरे यांच्यासह ‘जनसुराज्य’चे दोन संचालक आहेत. या दोन जागांसह अन्य एका जागेची मागणी कोरे यांनी यापूर्वीच केली आहे. त्याचबरोबर प्रक्रिया गटातील संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या नावालाही त्यांनी विरोध केला आहे. हा विरोध डावलून पाटील यांना उमेदवारी दिल्यास कोरे यांच्याकडून प्रदीप पाटील-भुयेकर हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

किमान सहा तालुक्यात विकास संस्था गटातील विद्यमान संचालकांविरोधातच काहींनी दंड थोपटले आहे. त्यात शिरोळमधून गणपतराव पाटील हे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात, गडहिंग्लजमध्ये संतोष पाटील यांच्याविरोधात पाच-सहा जण, राधानगरीतून ए. वाय. पाटील तर भुदरगडमधून के. पी. पाटील यांच्याही विरोधात उमेदवारांनी बंडाचे निशान फडकवले आहे. अशा परिस्थितीत उर्वरित गटात भाजपने तुल्यबळ उमेदवार दिल्यास ही निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता आहे.

आमदार आबिटकरही प्रयत्नशील

बँकेत पतसंस्था गटातून प्रा. अर्जुन आबिटकर यांना रिंगणात उतरण्याचे प्रयत्न आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडून सुरू आहेत. ‘गोकुळ’प्रमाणेच जिल्हा बँकेतही आपल्याला प्रतिनिधत्‍व. हवे अशी त्यांची भूमिका आहे. आमदार आबिटकर महाविकास आघाडीचे घटक असले तरीही ते भावासाठी कोणतीही टोकाची भूमिका घेऊ शकतात, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा: सतेज पाटलांनी 14 नगरसेवकांची भेट घेताच जनता दलाच्या भेटीला महाडिक

गगनबावड्यातील तिढा कायम

गगनबावडा तालुक्यातील विकास सोसायटी गटातील संचालक पी. जी. शिंदे यांच्याच विरोधात पालकमंत्री सतेज पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पाटील हे सध्या विधान परिषदेचे उमेदवार असल्याने ते या निवडणुकीत उतरतील का नाही याविषयी शंका आहे. तथापि पाटील रिंगणात उतरले तर पी. जी. शिंदे काय करणार? हा प्रश्‍न आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी शिंदे यांच्या पत्नींना महिला गटातून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण, अद्याप हा तिढा सुटलेला नाही.

सातारा, सांगलीचे उदाहरण

सातारा जिल्हा बँकेत गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई, राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचे कट्टर समर्थक आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव अगदी साध्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सांगली बँकेतही राहुल महाडिक हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या तालुक्यातून विजयी झाले. त्यामुळे नेता कितीही मोठा असला तरी त्याचा पराभव होऊ शकतो हे या दोन बँकांच्या निकालावरून दाखवून दिले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा बँकेतही उमेदवार ठरवतानाचा नेत्यांची कसोटी लागणार आहे.

हेही वाचा: राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेस,भाजप, राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढतीचे संकेत

loading image
go to top