
Ambabai Temple
esakal
मुखदर्शनाची नवीन व्यवस्था:
यंदा शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने पितळी उंबऱ्याच्या बाहेरूनच देवीचे दर्शन देण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. गणपती चौक व गरुड मंडपाच्या महाव्दार बाजूने तात्पुरता जिना उभा करून दोन ठिकाणी मुखदर्शनाची सोय केली जाणार आहे.
त्र्यंबोली भेटीतील शिस्त व सुरक्षा:
पालखीच्या स्वागतावेळी होणारी हुल्लडबाजी टाळावी, तसेच परतीच्या वेळीही पोलिस बंदोबस्त असावा, अशी मागणी श्रीपूजक मंडळाने केली. गेल्या वर्षी हुल्लडबाजीमुळे मानकरी व सेवेकऱ्यांना धक्काबुक्की झाली होती.
भाविकांची सुविधा व सुरक्षारक्षकांना सूचना:
गरुड मंडपातील उभारणी तात्पुरती थांबवून अभिषेक व पालखी सोहळा सुरळीत पार पडणार आहे. भाविकांसाठी शेड, जिना आदी व्यवस्था करण्यात येणार असून सुरक्षारक्षकांना सौजन्याने वागण्याच्या सूचना देण्यात आल्या.
Amababai Temple Navratri : यंदा शारदीय नवरात्रोत्सव दहा दिवस असल्यामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना देवीच्या दर्शनासाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी नवरात्रोत्सव काळात पितळी उंबऱ्याच्या बाहेरूनच देवीचे दर्शन देण्याचा निर्णय आज देवस्थान समिती व श्रीपूजक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासोबतच त्र्यंबोली भेटीच्या सोहळ्यावेळी होणाऱ्या हुल्लडबाजीवर चाप बसावा, अशी मागणीही श्रीपूजकांनी केली.