esakal | शिक्षण मंडळात सावकारांचा अड्डा; अशिक्षित कर्मचाऱ्यांचा घेतला जातोय गैरफायदा
sakal

बोलून बातमी शोधा

School Fee

शिक्षण मंडळात सावकारांचा अड्डा

sakal_logo
By
डॅनियल काळे

कोल्हापूर : महापालिका आणि प्राथमिक शिक्षक मंडळ येथे खासगी सावकारांचा अड्डा आहे. भोळ्याभाबड्या, अशिक्षित कर्मचाऱ्यांचा गैरफायदा घेत या सावकारांचा धंदा तेजीत आहे. महापालिकेची पतसंस्था, सोसायटी असूनही कर्जासाठी कर्मचारी या सावकारांकडेच का जातात? याचा कधीतरी विचार करण्याची गरज आहे.

महापालिकेतील सावकारी बऱ्याच वर्षांपासून चर्चेत आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी, वार्डबॉय आया, यास अनेक वर्ग-३ आणि वर्ग-४ चे कमकुवत कर्मचारी या सहकारी पाशात ओढले आहेत. यातून सुटका करणे म्हणजे कठीण काम आहे. या सावकारांच्या व्याजाचा दर पाच ते दहा टक्के. लोकांची गरज पाहून व्याजाचा दर कमी जास्त केला जातो. तत्काळ पैसे मिळणे हे एक कारण आहे, की लोक या सावकारीकडे ओढले जात आहेत. व्याजाचा दर मोठा असल्यामुळे या सावकारांचे पैसे कधीही फिटत नाहीत. व्याज भरून हे कर्मचारी जेरीला येत आहेत. विशेष म्हणजे काही सावकारांनी भिशीच्या गोंडस नावाखाली हा धंदा वाढवला आहे. महापालिकेतील काही गब्बर सावकार महिन्याकाठी व्याजापोटी पाच, पन्नास हजार सहजच मिळवत आहेत.

हेही वाचा: लशीचा ठणठणाट; पंतप्रधानांचा कोल्हापूरवरच अन्याय का?

आम्ही काय पैसे व्याजाने घ्या म्हणून कोणाच्या दारात जात नाही. लोकच आमच्या दारात येतात, व्याजाने पैशाची मागणी करतात. आम्ही त्यांना पैसे देतो, त्या मोबदल्यात व्याज आकारतो, इतक्या सहजतेने ते या धंद्याचे समर्थन करतात. मुळात आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांचे अडाणीपण हे या सावकारांच्या पथ्यावर पडत आहे. कर्ज हवे आहे, तर बँकेतून घ्यावे, याविषयी कर्मचारी उत्सुक नाहीत. कागदपत्रांच्या कटकटीला कंटाळून हे कर्मचारी या खासगी सावकारांचा आसरा घेतात. या कर्मचाऱ्यांच्या अडाणीपणाच्या जिवावर हे सावकार गब्बर होत चालले आहेत. महापालिका प्रशासकीय स्तरावर हा ज्याचा त्याचा खासगी प्रश्न आहे? असे दाखवून बाजू काढण्याचा प्रयत्न केला जातो.

..तर पाशातून मुक्तता होईल

कामगार संघटनेने पुढाकार घ्यावा, महापालिकेची कर्मचारी संघटना आणि सोसायटी, तसेच पतसंस्था यांनी कर्मचाऱ्यांची सावकारीतून सुटका करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. गरजू कर्मचाऱ्यांना येथे कसे कर्ज उपलब्ध होईल, या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न केल्यास काही प्रमाणात कर्मचाऱ्यांची सावकारी पाशातून मुक्तता होऊ शकते.

हेही वाचा: भयानक! महिला पोलिसाने सासूला पेटविले; कौटुंबिक वादातून कृत्य

loading image