esakal | गोकुळ रणांगण; उमेदवारीत प्रमुख दावेदारांचा पत्ता कट, दोन्ही पॅनेलला धक्का

बोलून बातमी शोधा

election of gokul main leads application rejected of candide in kolhapur

निवडणुकीत सत्तारूढ आणि विरोधी पॅनेलच्या प्रमुख दावेदारांचाच छाननीत पत्ता कट झाला आहे.

गोकुळ रणांगण; उमेदवारीत प्रमुख दावेदारांचा पत्ता कट, दोन्ही पॅनेलला धक्का

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारूढ आणि विरोधी पॅनेलच्या प्रमुख दावेदारांचाच छाननीत पत्ता कट झाला आहे. यात गेल्या निवडणुकीत विरोधी पॅनेलमधून महिला प्रतिनिधी गटातील उमेदवार श्रीमती अंजना रेडेकर, आजऱ्यातील प्रमुख दावेदार जयवंत शिंपी, वसंत धुरे, सत्तारूढ गटाच्या महिला प्रतिनिधी गटातील संभाव्य उमेदवार भारती डोंगळे, विरोधी पॅनेलमधून उमेदवारीसाठी इच्छुक माजी आमदार (कै.) नामदेवराव भोईटे यांच्या पत्नी श्रीमती सुशीला आदींचे अर्ज वेगवेगळ्या कारणांसाठी अवैध ठरले. 

यातील सौ. माधुरी जांभळे यांनीही विरोधी आघाडीतून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी ५५ ठरावधारकांच्या सहीचे निवेदन नेत्यांकडे दिले होते; पण त्यांचाही अर्ज अवैध ठरला. गेल्या निवडणुकीत सत्तारूढ गटातून थोडक्‍या मतांनी पराभूत झालेले सदानंद हत्तरकी यांच्या पत्नी सौ. श्‍वेता यांचाही अर्ज अवैध ठरला. गगनबावडा तालुक्‍याला अनेक वर्षे प्रतिनिधीत्व नसल्याने जिल्हा बॅंकेचे संचालक पी. जी. शिंदे या तालुक्‍यातून इच्छुक होते; पण त्यांचाही अर्ज अवैध ठरला. अलीकडेच विरोधी आघाडीला पाठिंबा दिलेले आमदार प्रकाश आबिटकर हे यशवंत नांदेकर यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते, पण त्यांचाही पत्ता छाननीतच कट झाला. वर्षातील २४० दिवसांत ४० हजार लिटर दूध पुरवठा आणि संघाकडून दरवर्षी ४० टन पशुखाद्याची खरेदी या दोन मुद्यांवरच अनेक उमेदवारांच्या छाननीतच दांड्या उडाल्या आहेत. 

असेही अवैध अर्ज

दिनकर पाटील यांच्या अर्जासोबत प्रतिज्ञापत्र जोडलेले नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. देसाई या महिला इच्छुक उमेदवाराने उमेदवारीसाठी आवश्‍यक असणारी अनामत रक्कम भरलेली नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला आहे. 

हेही वाचा - ग्रेस गुणात तिसऱ्या नियमाचा अडथळा
 

छाननी आधीच माघारीचा प्रयत्न

एका इच्छुक उमेदवाराने निवडणूक लढवण्यासाठी पात्र ठरणारे कोणतेही नियम व अटींची पूर्तता केलेली नव्हती. त्यामुळे, आज सकाळीच हा इच्छुक उमेदवार घाई-गडबडीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे आला आणि साहेब माझा अर्ज छाननीत जाणार आहे. त्यामुळे, मला माझा अर्ज माघार घ्यायची आहे. यावर, अधिकाऱ्यांनीही छाननी आधीच माघार घेता येत नसल्याचे सांगून त्यांना तेथून बाहेर जायला सांगितले.

यांचे अर्ज ठरले अवैध 

छाननीत अर्ज अवैध ठरलेल्यांमध्ये यशवंत नांदेकर, सुशीला नामदेव भोईटे, माधुरी जांभळे, सुहासिनी प्रवीणसिंह पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांची पत्नी सौ. शैलजा पाटील, सुशील पाटील-कौलवकर, वसंतराव धुरे, अर्चना धैर्यशील देसाई, पी. जी. शिंदे, संभाजी आकाराम पाटील, के. एस. चौगले, सुप्रिया साळोखे, करवीर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी, श्‍वेता सदानंद हत्तरकी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता धनाजीराव देसाई, भारती डोंगळे, जिल्हा बॅंक माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव नंदनवाडे, सुहासिनी प्रवीणसिंह पाटील, माधुरी जांभळे, बाळासाहेब बाबासाहेब पाटील, विद्यादेवी नाथाजी पाटील, बाजार समिती संचालक शशिकांत आडनाईक आदींचे अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान, यापैकी काहींनी हकरत घेतली आहे. यावर उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.