वाढत्या खर्चामुळेच भाडेवाढ

मालवाहतूकदारांपुढे पेच; बॅंकेचा हप्ता थकल्यास दंडाचाही भुर्दंड
Fare increase due to rising costs freighters kolhapur
Fare increase due to rising costs freighters kolhapursakal
Summary

राज्याच्या अर्थकारणाला बळ देण्यात मालवाहतूकदारांचा मोठा वाटा आहे. अनेक अडथळ्यांवर मात करीत व्यवसाय करताना मालवाहतूकदाराला मनस्ताप सोसावा लागतो. यातून व्यावसायिक प्रामाणिकपणाला तडा जात आहे. यातून पळवाटा शोधत मालवाहतूक करणारे काही मोजके वाहतूकदार ‘गब्बर’ झाले. जेमतेम गुंतवणुकीचे वाहतूकदार कंगाल झाले. परिणामी, भाडे वाढले. अशा साधारण कारणांआडून महागाईचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत आहे. याचा वेध घेणारी मालिका आजपासून...

कोल्हापूर : युसूफभाईने ३०० रुपये दहा किलो भावात शाहू मार्केट यार्डातील सौद्यात १० पोती वांगी घेतली. ही पोती भाजीपाला मंडईत विक्रीसाठी टेम्पोत घालून आणली. पाच किलोमीटर अंतराच्या मालवाहतुकीसाठी टेम्पोचालकाने २५० रुपये भाडे घेतले. पोत्यांची हमाली शंभर रुपये, घटतूट ५० रुपये गेली. म्हणजे त्या वांग्याचा भाव ७०० रुपये झाला. त्यावर युसुफभाईने नफा कमवत ३० रुपये एक किलोची वांगी ६० ते ८० रुपये एक किलो भावात विकली. अंतिम फटका ग्राहकाला बसला. शहरातील मालवाहतुकीचे रोजचे प्रातिनिधिक ठळक उदाहरण आहे.

भाजीपाल्यासह अन्य मालाची वाहतूक टेम्पो, रिक्षा व अन्य गाड्यांतून होते. या गाड्या किमान दहा ते १५ किलोमीटरचे ॲव्हरेज देतात. पाच किलोमीटर अंतराच्या वाहतुकीसाठी ५० रुपयांचे डिझेल, ५० रुपये गाडीची झीज धरली तर १५० रुपये भाडे परवडू शकते. मात्र, १०० रुपये जास्त घेतले जातात, तेव्हा वाहतुकीचे भाडे महागले म्हणून वाहतूकदार टिकेचे धनी होतात.

याउलट मालवाहतूकदारांचे म्हणणे असे, की मालवाहतूक व्यवसायासाठी गाडी जुनी घेतली तर दोन लाख, नवी घेतल्यास साडेतीन लाख रुपये बसतात. कर्जाचा हप्ता तीन ते चार हजारांचा आहे. कर्ज घ्यायला गेल्यावर बॅंकेचे व्यवस्थापक कपाळावर आठ्या पाडूनच बोलतात. दहा हेलपाटे मारायला लावतात. कर्ज मिळेल की नाही, हे स्पष्ट सांगत नाहीत. चार-पाच बॅंकांत दीर्घकाळ पाठपुराव्यानंतर एखाद्या बॅंकेत कर्ज मिळते. अनेकदा नाद सोडावा लागतो. पहिल्याच पायरीवर मालवाहतूकदाराला मनस्ताप सोसावा लागतो.

पुढे कागदपत्रे नावावर करताना आरटीओ एजंटाला चार ते पाच हजार रुपये द्यावे लागतात. याशिवाय व्यवसाय सुरू होताना जम बसेपर्यंत दोन-तीन महिने जातात. तिथेच गाडीचे हप्ते थकतात. अशा थकीत रकमेवर किमान एक हजार २०० रुपयांचा दंड आहे. याशिवाय, अनेकदा माल भरताना, उतरताना गाडीचे नुकसान, वाहतूक पोलिसांचा पाचशेचा दंड, अचानक आलेल्या घरगुती अडचणीत आठ-दहा हजार खर्च होतात.

या साऱ्यात वाहतूकदाराला मनस्ताप सोसावा लागतो. त्यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करण्याची इच्छा पहिल्याच सहा महिन्यांत संपून जाते. एखादा हप्ता चुकला तर कोणी माफ करीत नाही. यातून मालवाहतुकीचे भाडे वाढवले जाते. त्याचा फटका ग्राहकाला बसतो.

हे अपेक्षित...

  • बॅंक, परिवहन, पोलिस, ग्राहकांनी सौजन्याने बोलावे.

  • हप्ते थकल्यावर दंड घ्या; मात्र त्याची रक्कम मर्यादित ठेवावी

  • वाहनांची कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करावी

  • मालवाहतूकदारांना किलोमीटर वजनाप्रमाणे भाडे निश्चित करून द्यावे

अनेक बेरोजगारांनी कर्ज घेऊन मालवाहतुकीच्या गाड्या घेतल्या. गाड्यांची संख्या वाढल्याने व्यवसाय विभागला. त्यामुळे सर्वच गाड्यांना भाडे मिळते, असे नाही. यातच दिवसभरात इंधन, गाडीचा खर्च व पोलिसांचा दंड जाऊन नफा फारसा राहत नाही. यात कधी कर्जाचे हप्ते थकले तर थेट गाडी ओढून नेली जाते. अशा स्थितीत हप्ते वेळेत जाण्यासाठी काही वेळा भाडेवाढ करावी लागते.

- कृष्णात चौगले, टेम्पोचालक-मालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com