esakal | संसाराचा गाडा रेटायचा कसा? कोटींची उलाढाल ठप्प झाल्याने व्यावसायिक चिंतेत

बोलून बातमी शोधा

null
संसाराचा गाडा रेटायचा कसा? कोटींची उलाढाल ठप्प झाल्याने व्यावसायिक चिंतेत
sakal_logo
By
आनंद जगताप

पन्हाळा : तालुक्‍यातील चार-पाच मोठ्या यात्रा तीन ते चार महिन्यांत करायच्या आणि वर्षाची आर्थिक बेगमी करणाऱ्या पन्हाळा तालुक्‍यातील छोट्या-मोठ्या धंदेवाल्यांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेली दोन वर्षे हात चोळत गप्प बसावे लागल्याने त्यांच्यापुढे संसाराचा गाडा कसा रेटायचा, हे प्रश्‍नचिन्ह आहे. दीपावली झाली की, बरोबर महिन्याने देवदिवाळी दिवशी येणारी कोलोली येथील गाडाई देवीची यात्रा, चैत्रारंभाच्या दिवशीच गुढीपाडव्याला होणारी पोर्ले तर्फ ठाणे येथील मसाईदेवीची यात्रा, चैत्र पौर्णिमेला होणारी जोतिबा तथा केदारलिंगाची वाडीरत्नागिरी येथील यात्रा, अक्षय्य तृतीयेनंतर होणारी कोतोलीची हनुमान यात्रा या मोठ्या व गावोगावच्या यात्रा बंद झाल्याने सात ते आठ कोटींहून अधिक रकमेची उलाढाल ठप्प झाली आहे.

शेजारच्या गावातील नागरिकांची यात्रेसाठी होणारी गर्दी, दुसऱ्या दिवशी गोडधोडासह तांबड्या भडक रश्‍श्‍याची पातेल्यावर पातेली संपणारी, माहेरी आलेल्या लेकी, त्यांच्यासाठी साड्या, बांगड्या, कुटुंबात दिवाळीसाठी नवीन कपडे घेण्याची पद्धत, खेळण्याची, मेवामिठाईची दुकाने, पाळणे यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा व्हायचा.. प्रसंगी कर्ज काढायचे; पण यात्रा करायची ही वृत्ती. त्यामुळे गावातील छोट्या-मोठ्या दुकानांसह बाहेरून येणाऱ्यांचाही सर्व प्रकारचा व्यवसाय चालायचा.

हेही वाचा: सरकारनं रेशन कमी केलंय, आम्ही मरावं का? शेतकऱ्यांनी मेलेलंच बरं; कर्नाटकच्या मंत्र्यांची जीभ घसरली

वाडीरत्नागिरी येथील जोतिबाची यात्रा तर महाराष्ट्रासह गुजरात, आंध्र, कर्नाटक राज्यांत प्रसिद्ध. यात्रेदिवशी चार ते पाच लाख भक्‍तांची हजेरी. लाखो नारळ, दहा ते पंधरा हजार पोती गुलाल नि तेवढेच खोबरे, लाखो रुपयांचा दवणा यात्रेच्या दोन-तीन दिवसांत खपायचा. आईस्क्रिम, लस्सी, कलिंगडे, काकड्या यांची लाखो रुपयांची विक्री व्हायची. या सर्वांवरच कोरोनामुळे बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जोतिबा डोंगरावरील गुरव समाजाचे तर भक्‍तांविना कंबरडेच मोडले आहे. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने वाहतूकदारही हवालदिल झाले आहेत. पन्हाळ गडावरील साधोबा उरूस, राक्षी, आपटी, आंबवडे, करंजफेण, नणुंद्रे, बोरपाडळे, सातवे गावांतील यात्रा बंद झाल्याने सर्वच बारा बलुतेदारांचे हाल सुरू असून, फिरत्या विक्रेत्यांसह स्थानिक व्यावसायिकांच्या पोटावर पाय आले आहेत. (क्रमश:)

"मसाईदेवीच्या यात्रेसाठी महिना-दीड महिना अगोदरच नवीन कपडे शिवायला रांग लागायची. सहायक घेऊन दीडशे ते दोनशे ड्रेस शिवायचो; पण यावर्षी कामच नाही. हातावरच्या बोटावर मोजणाऱ्यांनी यात्रा होईल म्हणून ड्रेस शिवायला टाकले; पण यात्रा रद्द होताच शिवायला टाकलेलेही परत नेण्यासाठीही फिरकलेले नाहीत."

- सुरेश कांबळे, एस. के. टेलर, पोर्ले

हेही वाचा: घेतली लस, आता बिनधास्त बंदोबस्त!

"माझ्या छोट्या किराणा, स्टेशनरीच्या टपरीत दररोज बऱ्यापैकी विक्री होते; पण यात्रेनिमित्त चांगल्यापैकी विक्री होईल म्हणून कर्ज काढून माल भरला; पण यात्राच रद्द झाल्याने माल तसाच आहे. आता देणेकऱ्यांचे देणे वेळेत कसे भागवायचे याची चिंता आहे."

- प्रकाश निकम, पोर्ले