esakal | गडहिंग्लज: अमर्याद वृक्षतोड बंद करा; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज: अमर्याद वृक्षतोड बंद करा; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

गडहिंग्लज: अमर्याद वृक्षतोड बंद करा; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज: अलीकडील काही महिन्यांपूर्वी आजरा रोडवर एक वृक्ष कोसळून वृद्धेसह दोघे ठार झाले. या घटनेने शहरातील धोकादायक असणाऱ्या झाडांची तोड सुरू झाली. परंतु, धोकादायक नसणाऱ्या झाडांचीही कत्तल सुरू झाल्याने हरित गडहिंग्लजला गालबोट लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे धोकादायकच्या नावाखाली सुरू असलेली अमर्याद वृक्षतोड बंद करावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले व श्रीरंग राजाराम यांनी केली आहे.

हेही वाचा: जेलफोडोचा प्रसंग अभिमानास्‍पद, आदर्शवत : वैभव नायकवडी

याबाबत मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना निवेदन दिले आहे. मुळात आजरा रोडवरील ती घटना धोकादायक झाडाने नव्हे तर, केबल टाकण्यासाठी काढलेल्या चर खोदाईतून मुळे कमकुवत झाल्याने झाली आहे. पावसाळ्यात अशा घटना घडू नयेत म्हणून धोकादायक झाडे बाजूला करण्यास हरकत नाही. परंतु, संपूर्ण झाड काढण्याऐवजी त्याच्या फांद्या तोडणे गरजेचे आहे. मध्यंतरी नेहरु चौकातील पिंपळाचे झाड तोडण्याचा प्रयत्न झाला. त्याला विरोध झाल्यानंतर हा प्रयत्न थांबला.

तरीही अधूनमधून त्या झाडाच्या फांद्या तोडल्या जात आहेत. एक दशकापूर्वी शहरात गल्लोगल्ली लावलेल्या झाडांमुळे आज गडहिंग्लजवर हिरवाईची शाल पांघरली आहे. हरित गडहिंग्लज म्हणून शहर नावारुपाला आले आहे. बाहेरुन येणाऱ्या अनेक मान्यवर या हिरवाईची कौतुकही करीत आहेत. अशा परिस्थितीत धोकादायकच्या नावाखाली अनेक झाडे कापली जात आहेत.

केवळ फांद्या तोडण्याऐवजी अर्ध्यावर झाड तोडले जात आहे. हा प्रकार थांबणे गरजेचे आहे. पालिकेने आजपर्यंत शहराची हिरवाई टिकवून ठेवली आहे. परंतु, मोठी झालेली झाडे कोणत्या तरी कारणाने तोडून हरित गडहिंग्लजच्या संकल्पनेला बाधा येऊ नये, याची खबरदारी पालिकेने घ्यावी अशीही मागणीही करण्यात आली आहे.

loading image
go to top