esakal | पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या ‘गोकुळ’चा उद्या निकाल; ९९.७८ टक्के मतदान
sakal

बोलून बातमी शोधा

पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या ‘गोकुळ’चा उद्या निकाल;  ९९.७८ टक्के मतदान

पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या ‘गोकुळ’चा उद्या निकाल; ९९.७८ टक्के मतदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालकपदासाठी आज ईर्ष्येने ९९.७८ टक्के मतदान झाले. एकूण तीन हजार ६४७ ठरावदारांपैकी तीन हजार ६३९ ठरावदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

तीन ठरावदारांचा यापूर्वीच कोरोनाने मृत्यू झाला आहे; तर अन्य पाच ठरावदार आजारी असल्याने मतदानास उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाची ईर्ष्या दिसून आली. करवीर तालुक्‍यातील १२ मतदान केंद्रांवर दुपारी ३.४० पर्यंत १०० टक्के मतदान पूर्ण झाले.

दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) सकाळी आठपासून रमणमळा येथील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात होणार असून, या निकालाबाबत जिल्ह्यात कमालीची उत्सुकता आहे. दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होईल.

हेही वाचा- कोरोना रुग्णांच्या मृत्युची वाट पहायची का ? आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच ही स्थिती

‘गोकुळ’च्या संचालकपदाच्या २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात उतरले होते. आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या सत्तारूढ गटाविरोधात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनी एकत्र येऊन मोट बांधली. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

जिल्ह्यातील १२ तालुक्‍यांतील ७० केंद्रांवर आज मतदान झाले. प्रत्येक केंद्रावर ५० ठरावदारांच्या मतदानाची सोय करण्यात आली होती. तथापि, तालुक्‍यात शक्तिप्रदर्शनार्थ दोन्ही बाजूंनी एकत्रच ठरावदारांना मतदान केंद्रावर आणल्याने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचा फज्जा उडाला. ‘गोकुळ’च्या निमित्ताने दोन महिन्यांपासून सत्तारूढ आणि विरोधकांवर राजकीय चिखलफेक सुरू होती. ‘गोकुळ’ची निवडणूक रद्द व्हावी, यासाठी सत्तारूढसह काही संस्था उच्च व सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. मात्र, न्यायालयाने निवडणूक रद्द न करता ७० मतदान केंद्रांवर मतदान घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आजची निवडणूक झाली.

सात तालुक्‍यांत १०० टक्के मतदान

करवीर, कागल, चंदगड, हातकणंगले, गडहिंग्लज, पन्हाळा व शिरोळ या सात तालुक्‍यांत १०० टक्के मतदान झाले. प्रत्येक ठरावदार मतदाराला फोन करून तो कुठे आहे, त्याला घ्यायला वाहन पाठवू का? अशी विचारपूस करून सर्व नेते आणि उमेदवार आपापल्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत होते. त्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्‍यांत १०० टक्के मतदान झाले.

Edited By- Archana Banage

loading image