esakal | भारतीय कुस्तीचा चालता बोलता इतिहास उलगडणार...!
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय कुस्तीचा चालता बोलता इतिहास उलगडणार...!

भारतीय कुस्तीचा चालता बोलता इतिहास उलगडणार...!

sakal_logo
By
मतीन शेख

कोल्हापूर : कुस्ती हा रांगडा खेळ. प्राचीन काळापासून हा खेळ चालत आला आहे. देश व महाराष्ट्राला कुस्तीचा मोठा इतिहास व परंपरा लाभली आहे. कुस्ती निवेदनाच्या माध्यमातून पै. शंकर पुजारी (रा.कोथळी जि.कोल्हापूर) यांनी मुकी कुस्ती चालती बोलती केली. पुजारी यांचे आयुष्य कुस्तीला उन्नत करण्यात गेलं. कुस्ती संबंधी विस्तृत आशयाचे 'भारतीय कुस्ती : इतिहास आणि परंपरा' हे पुस्तक लवकरच वाचकांच्या हाती येणार आहे.

पुस्तकाला जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे. कुस्तीच्या इतिहासाचा पट पुस्तकाच्या माध्यमातून पहिल्यांदाच उलगडला जाणार आहे. कुस्तीला शब्दांकित करण्याचे काम या पुस्तकातून झाले आहे. कुस्तीचे लिखित दाखले वेद, पुराणकथांमध्ये आढळतात. तेव्हा पासुन चालत आलेला हा खेळ पुस्तक रुपाने मांडण्याचा प्रयत्न झाला आहे.

हेही वाचा: कोल्हापूर जिल्ह्यात चाचण्या दुप्पट करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

क्रिडा रसिक, कुस्तीप्रेमी व नवोदित मल्लांसाठी एक महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ साकारला गेला आहे. पुस्तकाची लेखनशैली, मांडणी लक्षवेधी आणि आकर्षण करण्यात आली आहे. या पुस्तकातून भारतीय कुस्तीचा रंगीत इतिहास सचित्र स्वरुपात लोकांसमोर येत आहे. कुस्तीची परंपरा, आचारसंहिता, व्यापकता व महाराष्ट्राच्या माणसांच्या जीवनशैलीत कुस्तीचे असलेले महत्त्व असा मौलिक आशय शब्दबद्ध झाला आहे.

कुस्तीतल्या डावपेचां बद्दल, त्यातल्या तंत्रशुद्धते संदर्भात सामान्यांना माहिती नसते. परंतू या पुस्तकातून मातीवरची कुस्ती, मॅटवरील कुस्ती, कुस्तीचे विविध प्रकार, महाराष्ट्रातील कुस्तीची प्रमुख प्रशिक्षण केंद्रे, प्रसिद्ध कुस्ती मैदाने, गाजलेल्या कुस्त्यांचे वर्णने अशी वाचनिय माहिती मिळणार आहे. तसेच महाराष्ट्राने घडवलेले हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरीचा इतिहास याची सखोल माहिती एकत्रित संकलीत झाली आहे.

महाराष्ट्राचे लोक कुस्तीवेडे आहे. त्यांची कुस्ती बद्दलची आत्मियता, तळमळ या पुस्तकात मांडली आहे. तसेच मल्लांच्या जुन्या आठवणी व किस्से रजंक स्वरुपात दिलेले आहेत. पुस्तकाच्या दुसऱ्या भागांमध्ये शंकर पुजारी यांचे आत्मचरित्र रेखाटण्यात आले आहे. त्याचा कुस्तीचा श्रीगणेशा, उमेदीचा काळ ते कुस्ती निवेदना पर्यंत पोहचलेला प्रवास याचे वर्णन लक्षवेधी आहे. त्यांचे हे पुस्तक कुस्तीसंबंधी नव्या पिढीसाठी प्रेरक व मार्गदर्शक ठरणार आहे. दरम्यान, उद्या (बुधवारी) या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम ऑनलाईन होणार असून पुस्तकाचे रावसाहेब पुजारी यांनी शब्दांकन केले आहे. तेजस प्रकाशन संस्थेने पुस्तक प्रकाशित केले आहे.

हेही वाचा: संकेश्वरात बनली 5 तासांच्या चार्जिंगवर धावणारी इको फ्रेंडली मोटार

"हे पुस्तक लोकांसमोर येत आहे याचा आनंद आहे. तांबड्या मातीच्या सानिध्यात माझं आयुष्य गेलं.कुस्तीने खुप दिलं. निवेदनाच्या माध्यमातून कुस्तीची सेवा करता आली. अनेक दशके कुस्तीचा इतिहास तोंडी मांडत होतो. या पुस्तकाच्या माध्यमातून तो लिखित स्वरुपात येत आहे."

- पै.शंकर पुजारी (जेष्ठ कुस्ती निवेदक)

loading image