esakal | दिलासादायक! वस्त्रनगरीत 45 टक्के उपचार घरातच

बोलून बातमी शोधा

दिलासादायक! वस्त्रनगरीत 45 टक्के उपचार घरातच
दिलासादायक! वस्त्रनगरीत 45 टक्के उपचार घरातच
sakal_logo
By
पंडीत कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : वस्त्रनगरीत कोरोनाचा दुसर्‍या लाटेतही कहर सुरुच आहे. बाधीत रुग्णसंख्या झपाट्यांने वाढत असल्यांने चिंता व्यक्त होत आहे. पण सुदैवाने कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असणारे अथवा लक्षणे नसणारे तब्बल 45 टक्के बाधीत रुग्ण हे घरीच राहून उपचार घेत आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवरील ताण कांही अंशी तरी कमी होण्यास मदत होत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत वस्त्रनगरी अक्षरशः होरपळून निघाली होती. जिल्ह्यातील सर्वात मोठा कोरोनाचा हॉटस्पॉट इचलकरंजी ठरली होती. त्यावेळी आयजीएम रुग्णालयावर प्रचंड ताण आला होता. पालिकेकडून चार कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले होते. तेथे बाधीत रुग्णांना सुविधा देतांना पालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली होती. अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळाला नव्हता. त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाणही मोठे होते. त्याचे मोठे पडसाद प्रशासन पातळीवर उमटले होते.

हेही वाचा- 'गोकुळ' मधून १५ दिवसाला महाडिक घेतात ८० लाखांचे भाडे; सतेज पाटीलांचा घणाघाती आरोप

आता दुसर्‍या लाटेमध्येही इचलकरंजी पून्हा हॉटस्पॉट होत आहे. आयजीएम रुग्णालय फुल्ल झाले आहे. पालिकेने सुरु केलेले व्यंकटेश्‍वरा हायस्कूल कोविड केअर सेंटरमध्येही जागा शिल्लक नाही. त्यामुळे तातडीने तात्यासाहे मुसळे हायस्कूल हे दुसरे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अद्याप समाधानकारक नाही. त्यामुळे सक्रीय रुग्णांचे प्रमाण वाढत चालल्यांने चिंता व्यक्त होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर एक दिलासादायक बाब म्हणजे घरी अलगीकरणात उपचार घेणार्‍यांची संख्या सुमारे 45 टक्के इतकी आहे. खासगी वैद्यकीय तज्ञांच्या नियंत्रणाखाली अनकेजण घरीच राहून उपचार घेत आहेत. यामध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेले अथवा लक्षणे नसलेल्या रुग्णांचा समावेश आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून निष्पन्न झाल्यानंतर पॉझीटीव्ह आलेले अनेकजण गृह अलगीकरणातच उपचार घेण्यास प्राधान्य देत आहेत.

घरीच उपचार घेण्यासाठी शासनाची नियमावली आहे. यामध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. घरी उपचार घेण्यासाठी साधारणपणे घरामध्ये स्वतंत्र खोली, स्नानगृह व शौचालय असणे बंधनकारक आहे. अशी सुविधा असेल तर त्याची यंत्रणेमार्फत पाहणी केल्यानंतर परवानगी दिली जाते. त्यानुसार शहरात अनेकजण घरीच राहून उपचार घेत असल्यांने हायरिस्क असलेल्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध होण्यास मदत होत आहे.

Edited By- Archana Banage