
Illegal Jungle Safari
esakal
ठळक मुद्दे (Highlights):
जंगल सफारीच्या नावाखाली ‘अधिकृततेचा’ गोंधळ:
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या जंगल परिसरात दररोज १५० हून अधिक गाड्या जंगलात सफारी चालवतात, पण त्यापैकी फक्त ७ गाड्याच वन विभागाच्या अधिकृत परवान्याने चालतात. उर्वरित गाड्यांवर कोणतेही नियंत्रण नाही.
अनधिकृत सफारींमुळे पर्यावरण धोक्यात:
अनेक चालक उघड्या जीप जंगलात कुठेही थांबतात, मोठ्या आवाजात गाणी लावतात, फांद्या तोडतात, प्लास्टिक फेकतात — यामुळे वन्यजीव भयभीत होतात आणि जंगलाचा समतोल बिघडतो.
वन विभागाकडे नियंत्रणाची गरज:
जंगल सफारीच्या नावाखाली चालणारे आर्थिक व्यवहार हे वनसंपत्तीवरील अप्रत्यक्ष अतिक्रमणच असल्याचे स्पष्ट झाले असून, सफारी गाड्यांची अधिकृत नोंदणी, चालक प्रशिक्षण आणि ठरावीक मार्ग निश्चित करण्याची तातडीची मागणी होत आहे.
Kolhapur Illegal Jungle Safari : जंगलाच्या हद्दीत अथवा जंगलालगतच्या परिसरात इमारत बांधकाम करणे, दुकाने उभारणे किंवा जागा व्यापणे एवढेच अतिक्रमणाचे मर्यादित स्वरूप नाही, तर वन विभागाच्या अखत्यारितील जंगलहद्दीचा विनापरवाना वापर करून नैसर्गिक साधनसंपत्तीची झीज घडवून, व्यक्तिगत नफा मिळवणे हे वनसंपत्तीवरील अतिक्रमणच आहे.
अशाच प्रकारे जंगल सफारीच्या नावाखाली जिल्ह्यात दररोज सुमारे १५० हून अधिक गाड्या जंगल हद्दीत फिरतात आणि आर्थिक व्यवहार करतात. त्यामुळे ‘असे अतिक्रमण वन विभाग कधी गांभीर्याने घेणार?’ हा प्रश्न ठळकपणे पुढे आला आहे. नागपूरच्या ताडोबा अभयारण्यात वाघ दिसतो, तर कर्नाटकातील दांडेली जंगलात काळा बिबट्या आणि हत्ती दिसतात. त्यामुळे तिथेही जंगल सफारीची सुविधा आहे. त्याच धर्तीवर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांच्या पश्चिम भागातील जंगल परिसरातही वन्यजीव व वनसंपदा अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक येतात. अशा पर्यटकांना फिरवण्यासाठी काही ठिकाणी जंगल सफारीची सेवा उपलब्ध आहे; मात्र कोणत्या सफारी अधिकृत आणि कोणत्या अनधिकृत, हा पेच कायम आहे.
कोल्हापूर जिल्ह्यालगतचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि त्याला लागून असलेले चांदोली अभयारण्य या परिसरात चार वर्षांपूर्वी वन्यजीव विभागाने अधिकृत जंगल सफारी सुरू केली होती. सुरुवातीला प्रतिसाद मर्यादित मिळाला आणि काही काळानंतर वन्यजीव विभागाच्या गाड्या बंद पडल्या. त्यानंतर या परिसरातील काही खासगी जीप चालकांनी स्वतःच्या पातळीवर सफारी सुरू केल्या. वन्यजीव विभागाने काही नियम घालून त्यांना मान्यता दिल्याचे सांगितले जाते, मात्र त्याबाबत अधिकृत फलक अथवा सूचना दिसत नाहीत. अशीच स्थिती राधानगरी आणि दाजीपूर परिसरात आहे.
सात गाड्या अधिकृत
जिल्ह्यातील सहा घाटमार्ग घनदाट जंगलातून जातात. या मार्गांवर गवे, बिबट्या, पट्टेरी वाघ, अस्वल, हरणे यांचे वास्तव्य असून ते अनेकदा रस्त्यांवरूनही दिसतात. या भागात पर्यटकांच्या तसेच सफारीच्या गाड्यांची वर्दळ असते. सध्या दाजीपूर व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दोन ठिकाणी सफारी गाड्या वन्यजीव विभागाच्या मान्यतेने कार्यरत आहेत. त्या गाड्यांची संख्या केवळ सात आहे.
दृष्टिक्षेपात
जंगल सफारीच्या गाड्यांचे भाडे - १२०० ते १८०० रुपये
स्थानिकांना रोजगार मिळत असला, तरी योग्य प्रशिक्षणाचा अभाव
उघड्या जीप जंगलात कुठेही थांबतात
पर्यटक झाडांच्या फांद्या तोडतात
आरडाओरड करतात. मोठ्या आवाजात गाणी लावतात
मोठ्या आवाजामुळे वन्यप्राणी भयभीत होतात
प्लास्टिक कचरा, बाटल्या कुठेही फेकतात
परिणामी पर्यावरणाचा समतोल बिघडतो
हे बदल करणे आवश्यक
सफारीच्या गाड्यांची सेवा अधिकृतपणे नोंदवावी
चालकांना योग्य प्रशिक्षण द्यावे
सफारीसाठी ठरावीक मार्ग निश्चित करावेत
जंगलात गाड्या किती वेळ, कुठे थांबू शकतात, याचे बंधन असावे
ठरावीक शुल्क भरून कंत्राटी सेवा सुरू करण्यास हरकत नसावी
प्रत्येक जंगल सफारी गाडीची अधिकृत नोंद वन विभागाकडे आवश्यक
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):
Q1. जिल्ह्यात किती अधिकृत जंगल सफारी गाड्या आहेत?
👉 सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि दाजीपूर परिसरात फक्त ७ गाड्या वन विभागाच्या मान्यतेने कार्यरत आहेत.
Q2. दररोज किती गाड्या जंगल परिसरात जातात?
👉 अंदाजे १५० हून अधिक गाड्या दररोज जंगल हद्दीत प्रवेश करतात, ज्यापैकी बहुतांश अनधिकृत आहेत.
Q3. अनधिकृत जंगल सफारीमुळे नेमका धोका कोणता?
👉 आवाज, प्रदूषण, वृक्ष तोड, प्लास्टिक कचरा, आणि प्राण्यांच्या अधिवासात व्यत्यय — यामुळे वन्यजीव भयभीत होतात आणि पर्यावरणीय संतुलन बिघडते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.