

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरापासून तो बेपत्ता होता. त्याला तेलंगणातून अटक केल्याची माहिती समोर आलीय. प्रशांत कोरटकरला अटक केली ही समाधानाची बाब असल्याची प्रतिक्रिया इंद्रजित सावंत यांनी दिली. मात्र त्याला महिन्याभरापासून वाचवण्यासाठी प्रयत्न झाल्याचं वाटतं अशा शब्दात त्यांनी शंकाही व्यक्त केली. वाचवण्याचे प्रयत्न झाले असतील तर संबंधितांवरही कठोर कारवाई व्हावी आणि चौकशी व्हावी अशी मागणी इंद्रजित सावंत यांनी केलीय.