जोतिबा चैत्र यात्रा विशेष|जोतिबाची दर्शन पद्धत

तुळशी वृंदावनास नमन करून दर्शनास सुरुवात करावी.
जोतिबाची दर्शन पद्धत
जोतिबाची दर्शन पद्धतsakal

तुळशी वृंदावनास नमन करून दर्शनास सुरुवात करावी. कारण, त्या तुळशीत मारुती आहे. मारुती हा पुरुष व तुळशी स्‍त्री म्हणजे माया आणि मन यांचे प्रतीक हे वैशिष्ट्य. नंतर दोन नंदींचे दर्शन घ्यावे. सगुण आणि निर्गुण हे भक्तीचे दोन मार्ग याचे प्रतीक. यांच्या दर्शनाने रज-तम-शरीर शुद्ध होते. शिवाय दिसायला चार खांब, परंतु तीनच खांबांवर हे मंदिर उभे आहे, हे याचे वैशिष्ट्य.

मंदिरासमोरच्या गाभाऱ्यात तीन लिंगे आहेत. संख्येने तीन म्हणजे रज-तम-सत्त्व गुणांचे माहेरच याचे प्रतीक. याचे दर्शन घ्यावे. हे मंदिर बिनखांबी असून, याच्या छताला १२१ म्हणजे लघुरुद्राच्या संख्येत असणाऱ्या फरश्या हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. पुढे असणाऱ्या श्रीगणेशाचे दर्शन घ्यावे. ज्ञानाचं लेणं घ्यावयाचे असल्यास या मूर्तीपुढे लीन होऊन याचना करावी. ही मंगलमूर्ती ज्ञानदर्शकतेचे मूळ आहे, म्हणूनच अभिषेक-धूप आरतीची व पूजेची सुरुवात इथूनच होते. पुन्हा आदिमाया शक्ती म्हणजे जगदंबा होय. मूळ लक्ष्मीच्या रूपात रक्तभोजाचे रक्त चारण म्हणजे चाटल्याने चोपडाई या नावाने संबोधले आहे. शक्तीची उपासना करून पश्चिमेला मुख असलेल्या महिषासुरमर्दिनीचे दर्शन सूर्यसुद्धा वर्षातून एकदा तरी घेतो, हे या मंदिराचे वैशिष्ट्य.

श्री जोतिबाच्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी चौकटीवर असलेल्या श्रीगणेशाचे दर्शन घ्यावे. ही मूर्ती आपणास सूचना देते, की आपल्या अंगी असलेले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्विकारांचे प्रतीक असलेल्या उंबऱ्यावरील सहा कलशांना स्पर्श करून प्रवेश करावा आणि स्पर्श केल्याने खरोखरच षड्विकार बाहेर राहतील, अशी प्रार्थना करून ऋद्धी-सिद्धी असणाऱ्या विवेक आणि वैराग्य यांचे प्रतीक समजून दोन गणपतींचे दर्शन घ्यावे.

मुख्य मूर्ती म्हणजे श्री जोतिबाचे दर्शन घ्यावे. हा तर सर्व यात्रेचा केंद्रबिंदू! याचा महिमा वर्णिला आहे. भक्तिभावाने याचना करून ईप्सित साध्य करा. ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहे, हे वैशिष्ट्य अगाध आहे. कारण दक्षिण दिशा ही यम दिशा आणि त्यापासून होणाऱ्या त्रासाला, संकटाला शह देण्याचे सामर्थ्य, शक्ती फक्त या ब्रह्मा-विष्णू-महेश्वर यांच्यानंतर चौथा जमदग्नी आणि पाचवा रवी अशी ज्योत असणाऱ्या ज्योर्तिमय ज्योती स्वरूपातच आहे. - नंतर पश्‍चिमेकडे तोंड करून प्रदक्षिणा घालताना आत्माराम म्हणजे श्री रामलिंगाचे दर्शन घ्यावे. याच्या दर्शनाने अंतरात्मा सुखावेल आणि नीजधामी मोक्षप्राप्तीचा विधिलेख लिहिला जाईल. मग श्री काळभैरव शिष्य श्री शनी देवाचे दर्शन घेऊन अशी प्रेरणा मिळवू या की, हे शनी देवा, तुम्ही जसे गुरूच्या चरणी लीन आहात तशीच सद्बुद्धी आम्हाला दे व तुमची कृपा सदैव आम्हांवर असू दे अशी प्रार्थना करावी.

शेवटी श्री काळभैरवाचे दर्शन घ्यावे. या क्षेत्रपालाचे महत्त्व हे मानवप्राण्या, तुझा कोणत्याही बाबतीत अतिरेक झाला तर या काळभैरवाचा दंड तुझ्यामागे लागेल, तर सावध राहा व सुकृताप्रमाणे या मानवयोनीचा योग्य उपयोग करून तू सुखी हो आणि इतरांनाही सुखी कर. हाच या यात्रेचा प्रसाद म्हणून घेऊन जाताना माझ्यासमोर नारळ फोडून घे आणि आपल्या कर्तव्याला लाग. हेच या यात्रेचे सार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com