कोल्हापूर : व्हॉल्व्ह ते नळ पाण्याचा २४X७ प्रवास

ऊन, वारा, पावसात पुरवठ्यासाठी अखंड सेवा
निखिल सदाशिव कांबळे
निखिल सदाशिव कांबळेsakal

ऊन, वारा, पावसात पुरवठ्यासाठी अखंड सेवा पावसाचे पाणी नळातून कसे येते? या बालसुलभ प्रश्नाचे उत्तर देताना अनेकांचा गोंधळ उडतो. नदीतून टाकीत आणि टाकीतून नळात एवढीच प्रक्रिया माहिती असते, पण यामागे असंख्य हात २४ तास राबत असतात. वाटेत येणारा प्रत्येक अडथळा पार करत नदी जशी प्रवाही असते तसेच पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सर्व समस्यांवर मात करत अहोरात्र सक्रिय असतात. अपुरे मनुष्यबळ, अपुरी साधने, नागरिकांचा रोष तर लोकप्रतिनिधींचा तगादा या सगळ्यांचा सामना करत त्यांचे काम सुरू असते. पाण्याचा हा प्रवास रंजक आहे. या प्रक्रियेचा आणि त्यातील माणसांच्या कामाचा हा थेट आँखो देखा हाल.

निखिल सदाशिव कांबळे, हे महापालिकेत ठोक मानधनावर पाणीपुरवठा विभागात काम करतात. पहाटे पाच वाजता गिरगावातून निघतात. त्यांच्या गाडीचे साडीगार्डला असणारे फुटरेस्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे फुटरेस्ट आणि समोरील गार्ड याचा उपयोग ते पाना ठेवण्यासाठी करतात. हे पाने घेऊन बरोबर सहाच्या सुमारास ते हॉटेल सयाजीसमोर येतात. येथे रस्त्याच्या मधोमध पाण्याचा व्हॉल्व्ह आहे. या रस्त्यावरून रोज शेकडो माणसे जातात, मात्र कोण्याच्याही लक्षात हा व्हॉल्व्ह येत नाही. निखिल यांना मात्र या परिसरातील सर्वच व्हॉल्व्हची कल्पना आहे. कारण हे व्हॉल्व्ह सुरू करून पाणीपुरवठा करण्याचे काम निखिल यांच्याकडेच आहे. हे व्हॉल्व्ह वेगवेगळ्या मापाचे असतात. ६ ते १० इंची व्हॉल्व्हसाठी एक पाना, तर १२ इंची व्हॉल्व्हसाठी दुसरा पाना आहे. हे दोन्ही पाने घेऊन निखिल व्हॉल्व्ह सोडण्यासाठी कावळा नाका परिसरातील विविध भागांत जातात. दररोज ४५ व्हॉल्व्ह सोडायचे आणि बंद करायचे हे त्यांचे काम आहे.

उन्हाळा असो की धो-धो पाऊस पडत असो किंवा कडाक्याची थंडी असो. नित्यनियमाने त्यांना पहाटे पाणी सोडण्यासाठी बाहेर पडावेच लागते.पाणी सोडताना संबंधी जलवाहिनी कोणत्या भागात पाणी पोहचवणार आहे. त्या भागात वेळापत्रकानुसार किती वाजता पाणी सोडणे गरजेचे आहे. या सगळ्यांचा हिशेब त्यांच्या डोक्यात सुरू असतो. सयाजी हॉटेलसमोरील व्हॉल्व्ह सोडला की पाणी उमा टॉकीजपर्यंत जाते. तर कावळा नाका येथील व्हॉल्व्ह सोडला की लोणार वसाहत आणि परिसरात पाणी पोहचवले जाते. यामध्येही शिंगणापूर पाणी योजनेचे पाणी आणि अन्य ठिकाणांवरून उपसा केलेले पाणी यामध्ये समन्वय ठेवावा लागतो. शिंगणापूर योजनेचे पाणी जलवाहिनीमार्फतच पुरवले जाते. त्याचा साठा केला जात नाही. उंचावरील भागात शिंगणापूर योजनेचे पाणी दुसऱ्या मजल्यावर चढत नाही.

मग निखिल यांनी एक क्लुप्ती केली. ते शिंगणापूर योजनेतील पाण्याचा व्हॉल्व्ह सोडला की कावळा नाका फायर स्टेशनच्या पिछाडीस असणाऱ्या टाकीचा चक्री व्हॉल्व्ह सुरू करतात. म्हणजे शिंगणापूरच्या जलवाहिनीतील पाण्याच्या टाकीतील पाणी गतीने पुढे ढकलते. त्यामुळे शिंगणापूरच्या पाण्याला दाब आणि गती दोन्ही प्राप्त होते. मग हे पाणी लोणार वसाहत आणि त्या परिसरातील घरामध्ये दुसऱ्या मजल्यापर्यंत वर चढते. ही सगळी गणिते डोक्यात ठेवून पाणी सोडण्याचे काम करावे लागते.सकाळी ६ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री १० आणि रात्री १० ते सकाळी ६ अशा शिफ्टमध्ये पाणीपुरवठा कर्मचारी काम करतात. शहरातील सर्व टाक्या रात्री भरून घेणे आणि पहाटे ५ वाजता काही व्हॉल्व्ह सुरू करणे हे काम रात्रपाळीच्या व्यक्तीला करावे लागते.

पाणी सोडण्याव्यतिरिक्त बाकीच्या गोष्टीही त्यांना पाहाव्या लागतात. याबद्दल निखिल सांगतात, ‘‘आम्ही ज्या भागात काम करतो तेथील नागरिकांकडे आमचा मोबाईल नंबर असतो. पाणी आले नाही की लगेच त्यांचा फोन येतो. पाणी सोडणार कधी? कधी कधी भागातील नगरसेवकही हक्काने पाण्याबाबत विचारपूस करतात. जलवाहिनीला गळती लागली की ती आम्ही शोधायची आणि ऑफिसला कळवायची. मग दुरुस्त करणारे लोक आले की त्यांना घेऊन स्पॉटवर जायचे त्यांच्याकडून दुरुस्ती करून घ्यायची. हेदेखील काम आम्ही सर्वजण करतो. सध्या शहरात विविध कारणांसाठी रस्ता खोदला जात आहे. अशावेळी जमिनीखाली ५ फुटांवर असणाऱ्या जलवाहिनीला धक्का पोहचतो. इथे गळती सुरू होते, पाणी वर येऊ लागले की दोन दिवसांनंतर कळते. मग पुन्हा ही गळती शोधून ती ऑफिसला कळवायची. व्हॉल्व्ह रस्त्यावरच असतो. काही वेळा व्हॉल्व्हवर चार चाकी उभी करतात. मग पहाटे त्या गाडीच्या मालकाला शोधायचे. त्यांना गाडी बाजूला करण्याची विनंती करायची मग व्हॉल्व्ह सोडायचा. नागरिकांच्या रोषाला सामोरे जाणारे पहिल्यांदा आम्ही असतो. कधी कोणी तरी वाईट बोलते. कधी कौतुकही करतात. अशा सर्व अनुभवांना घेऊन काम करायचे असते; पण आमच्या कामामुळे नागरिकांना पाणी मिळते. याचे समाधान मोठे असते निखिल अभिमानाने सांगतात...’’

त्यांची धडपड शुद्धतेसाठी पाणीपुरवठा विभागातील दुसरा मोठा विभाग म्हणजे फिल्टर हाउस. शहरात कळंबा, बावडा आणि नागदेववाडी या तीन ठिकाणी फिल्टर हाउस आहे. इथे २४ तास जल शुद्धीकरणाचे काम सुरू असते. त्यामुळे इथेही काम करणारे २४ तास शिफ्टप्रमाणे काम करतात. बावडा फिल्टर हाउसमधील कर्मचारी सांगतात, पंपिंग हाउसमध्ये नदीतून उपसा कलेले पाणी फिल्टर हाउसमध्ये येते. तेथे पाण्याची प्राथमिक चाचणी केली जाते. इथे पाण्याची चव, वास, ॲसिटिक, अल्कलीचे प्रमाण तपासतात. त्यानंतर चाचणी करून पावडरचा डोस किती द्यायचा, हे ठरवतात. एरिएशन आणि कोॲगुलेशन चाचणी इथेच होते. प्लॉब्युकेशनमध्ये पाण्यात तुरटी टाकली जाते. त्यामुळे मातीचे कण तळाला बसतात. यानंतर त्या पाण्याचे फिल्टरेशन केले जाते. यामध्ये वाळूच्या गाळण्यांमधून पाणी गाळले जाते. मग क्लोरिनचा डोस देतात. पाणी पूर्ण शुद्ध झाल्याची खात्री करून पाणीपुरवठा होतो.

म्हणून पाणी बिल भरा..

पाणी बिलासंदर्भात महापालिकेचे जलअभियंता अजय साळोखे यांच्यासोबत संवाद साधला...ते म्हणाले, ‘‘महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग सातत्याने काम करून नागरिकांना अत्यल्प दरात पाणी पुरवतो; मात्र या प्रक्रियेसाठी काही कोटींचा खर्च येतो. पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे कष्ट, महापालिकेचा खर्च याचे भान नागरिकांनी ठेवणे आवश्यक आहे. शहरातील पाणीपट्टी वसुलीसाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. नागरिकांनी वेळेत पूर्ण पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे.’’

पाणीपुरवठा विभाग

कर्मचारी ३५०

साठवणुकीच्या टाकी २०

पंपिंग हाउस ३

अंतर्गत पंपिंग हाउस ६

फिल्टर हाउस ३

पाणी कनेक्शन १ लाख २५ हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com