सर्वस्यादा जगदंबा...

महाराष्ट्र-कर्नाटक प्रांतात वेसरनामक व्यामिश्र शैली विकसित झाली आणि ती तिथेच जास्त लोकप्रिय झाली.
सर्वस्यादा जगदंबा...

त्रिकूट - प्रासाद स्वरूपातील मंदिर

मंदिराची व्याख्या करायची झाल्यास राहण्याजोगी वास्तू इतकी साधी-सोपी करता येईल. कालांतराने, देवतामूर्तींसाठी बनवलेली वास्तू ती देवमंदिर अशी संकल्पना रूढ झालेली दिसते. त्यातूनही हल्ली मंदिर म्हणजे देवतेचे निवासस्थान अशी धारणा पक्की झालेली आहे.

- डॉ. योगेश प्रभूदेसाई

साध्या राहायच्या वास्तूमधूनच देवमंदिराचा उगम झालेला दिसतो. अर्थात, यात वैदिक स्थापत्याचाही सहयोग दिसतो. म्हणजेच तलविन्यासात मंदिरे वैदिक, तर बांधणीत ती सर्वमान्य स्थापत्यासारखी असे समीकरण पक्के होत गेले. सुरुवातीची मंदिरे ही अगदी साधी लाकूड, विटांची होती. हळूहळू मंदिर वास्तूची गरज वाढू लागली, तसे त्यात बदल होत गेले. अगदी अंतर्बाह्य बदल घडले.

मंदिरबांधणीचे सामानही बदलले. लाकूड आणि विटांपेक्षा आता दगडाचा वापर जास्त होऊ लागला. सुरुवातीचे मंदिर एकाच खोलीचे असेल तर कालांतराने त्याला पुढे सोपा आला. नंतर अजून काही खोल्या वाढविल्या गेल्या. त्यांची प्रयोजनं निश्चित झाली. जसं, जिथं सभा भरवली जाऊ शकते असा तो सभामंडप. जिथून देवतेचे मुखदर्शन होऊ शकते तो मुखमंडप. पूर्वमध्य युगात मंदिरस्थापत्य ही वेगळी शाखा विकसित झालेली दिसते. त्या अनुषंगाने अनेकविध प्रयोग होत गेले. स्थानिक स्थापत्यशैली विकसित झाल्या. उत्तर भारतात नागर शैली, तर दक्षिणेत द्राविड शैली विकसित झाली.

महाराष्ट्र-कर्नाटक प्रांतात वेसरनामक व्यामिश्र शैली विकसित झाली आणि ती तिथेच जास्त लोकप्रिय झाली. मंदिरांचे बाह्यांग तर विकसित होतच होते; पण मंदिराचा तलविन्यासही विकसित होत होता. तंत्रशाखेच्या प्रभावामुळे मंदिराचा गर्भन्यास तांत्रिक-वैदिक अशा मिश्र पद्धतीने होऊ लागला. वास्तुपुरुषमंडल ही संकल्पना वैदिक पुरुषसूक्तावरून विकसित झाली आणि पाहता-पाहता सर्वच वास्तू प्रकारांचा प्राण होऊन बसली. पण, मंदिरवास्तूमध्ये मात्र ती जास्त प्रभावीपणे राबवली गेली.

कोणत्या देवतेच्या मंदिराचा गर्भविन्यास कोणत्या प्रकाराने करावा, याबद्दल नियम तयार झाले. परंपरेने चालत आलेले बांधकामाचे प्रकार, शिवाय सिद्ध झालेले नवनवीन प्रयोग ग्रंथोबद्ध होऊ लागले. मंदिरवास्तूमध्ये तंत्र, योग, खगोल, ज्योतिष, शिला परीक्षण आदी ज्ञानशाखांचा समावेश केलेला दिसतो. त्यामुळे मंदिर हे मंदिर न राहता भव्य महालासारखे बांधले जाऊ लागले. त्यामुळेच मंदिराला प्रासाद असेही नाव पडलेले दिसते.

आधीच नमूद केल्याप्रमाणे मंदिरवास्तूमध्ये विविध प्रयोग होत गेले. त्यातील एक महत्त्वाचा प्रयोग म्हणजे त्रिकूटप्रासाद. कूट म्हणजे निमुळते टोक (सहसा पर्वतशिखरांसाठी वापरला गेलेला शब्द). मंदिरे ही पर्वतशिखराप्रमाणे समजली जात असत आणि त्या पर्वताच्या गुहेत आवास असणारी ती देवता म्हणजेच गर्भगृहातील देवताविग्रह. सुरुवातीला एकाच पर्वतशिखराप्रमाणे दाखवली गेलेली मंदिरे (एककूट प्रकार) कालांतराने मोठ्या पर्वतराजीप्रमाणे दाखवायला सुरुवात झाली.

तीन, चार मंदिरे एकत्र जोडण्यात आली आणि त्याप्रमाणे त्यांना अनुक्रमे त्रिकूट-चतुष्कूट अशी संबोधने लाभली. या संयुक्त स्थापत्यात एकच सामायिक मंडप असतो आणि त्याच्या भोवतीने मंदिरांची रचना असते. या त्रिकूटप्रासादाचे उत्तम आणि वेगळे उदाहरण म्हणून आपल्याला अंबाबाईचे मंदिर पाहता येईल. हे मंदिर दोन कालखंडात बांधले गेल्याचे दिसते. अकराव्या शतकाच्या पूर्वाधात आणि उत्तरार्धात असे दोन स्पष्ट कालखंड दिसतात.

अंबाबाई त्रिकूटप्रासादात महाकाली (उत्तर दिशा, दक्षिणाभिमुख), अंबाबाई (पूर्व दिशा, पश्चिमाभिमुख) आणि महासरस्वती (दक्षिण दिशा, उत्तराभिमुख) अशा प्राधानिक रहस्यातील तीन देवतांच्या मंदिरांचा समावेश आहे. मध्ये एक सामायिक आणि प्रशस्त असा मंडप आहे. त्यातल्या त्यात अभिनव प्रयोग म्हणून हे मंदिर दोनमजली केलेले दिसते. वरच्या मजल्यावर शिवलिंग स्थापित केलेले आहे. यात आणखी अभिनव प्रयोग म्हणून अंबाबाई गर्भगृह आणि वरील शिवाचे गर्भगृह यांना तीन दिशांना तीन अंतर्गत दालने घेतलेली दिसतात.

कोणे एकेकाळी यांचे प्रयोजन निराळे असावे. याही पलीकडे जाऊन महाकाली आणि अंबाबाई मंदिराच्या बाह्यांगातही तीन देवकोष्ठे किंवा देवतायने घेतलेली दिसतात. यावरून इतका तरी अंदाज नक्कीच येतो, की कोणे एकेकाळी अंबाबा या देवतेचा अकल्पनीय असा संप्रदाय इथे अस्तित्वात होता आणि त्याचा प्रभाव आपल्याला स्थापत्याच्या माध्यमातून दिसतो.

(लेखक ः मंदिर शास्‍त्राचे अभ्यासक आहेत)

वेदातील देवी माहात्म्य

वैदिक वाङ्‍मय हा हिंदू धर्माचा पाया आहे. वैदिक वाङ्‍मयात ऋग्वेद हा प्राचीनतम आहे. काव्य, तत्त्वज्ञान आणि धर्मग्रंथ या तिन्ही दृष्टीने ऋग्वेदाचे महत्त्व सर्वाधिक आहे. ऋग्वेदातील दहा मंडलांमध्ये देवी उषा, निशा, श्रद्धा, वाक्-अंभृणी, सरस्वती, श्री, असुनीती आदी देवींचे उल्लेख विविध सूक्तांमध्ये आढळतात.

- प्रणव गोखले

उषादेवी

या सर्व सूक्तांमधील देवीवर्णनात उषेचे वर्णन सर्वाधिक आहे. ही देवता म्हणजे स्थूलरूपाने पहाटेवरून ओळखली जाते. मात्र, आध्यात्मिकदृष्ट्या साधकाचे आत्मजागरण करणारी देवी म्हणजे उषा होय. केवळ जडसृष्टीतील अंधारालाच नव्हे, तर मानवी अंतरंगातील अज्ञानाला दूर करणारी ही देवी उषा होय.

निशादेवी

दुसरी देवी निशा म्हणजेच रात्री देवी. ही सर्व पशुपक्षी, प्राणीसृष्टीला विश्रांती देणारी आणि विश्वावर अंधाराचा पडदा टाकणारी देवी मानली जाते. थोडक्यात, भौतिक जगातील रात्र आणि आध्यात्मिक दृष्टीने जीवाला होणारी आत्मविस्मृती, मोह, माया याची अधिष्ठार्थी म्हणजे रात्री होय. अज्ञाताचे ज्ञान अथवा भावी घटना होण्यासाठी या रात्रीदेवीची उपासना उत्तरकाळात प्रचलित झाली. पुराणकाळातील कालरात्री, काली या देवींची रूपे मूलतः वेदातील या रात्रीदेवीच्या कल्पनेवरून विकसित झाली, असे विद्वान मानतात. विद्या आणि अविद्या, ज्ञान आणि अज्ञान या अन्योन्याश्रित अमूर्त कल्पना उषासनक्ता या द्वंद्वदेवींच्या रूपात मूर्त झाल्या आहेत.

सरस्वती

वेदांमध्ये येणारा सरस्वतीचा उल्लेख हा प्राधान्याने नदीरूपातील आहे. आजच्या काळात जे महत्त्व गंगेला आहे, तेच वैदिक काळात सरस्वती नदीला होते. सरस्वती ही तत्कालीन समाजाची प्राणदायिनी आणि प्रेरणादायिनीही होती. उत्तर वैदिक काळात वाक् या देवीशी सरस्वतीचे ऐकात्म्य वर्णिले गेले आणि त्यातून पुढे पुराणकाळात वाग्देवता सरस्वती ही संकल्पना पुढे आली.

श्रद्धादेवी

श्रद्धादेवीला कामायनी असे म्हटले आहे. काम यापासून श्रद्धेची उत्पत्ती झाली, असे म्हटले जाते. श्रद्धा ही विश्वातील धर्मकर्मांना प्रेरणा देणारी देवता आहे. श्रद्धेमुळेच यज्ञ, श्रद्धेमुळेच दान आणि सदाचरण हे घडत असतात. ती श्रद्धा वेदात सगुणसाकार रूपात मानली गेली आहे.

वाक्-अभृंणी देवी

ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात वाक्-अभृंणी या ऋषिकेचे एक सूक्त येते. हेच देवीसूक्त म्हणूनही प्रसिद्ध आहे. खरं तर ऋषिका असणारी ही देवी आपल्या आत्मानुभूतीच्या जोरावर देवीपदापर्यंत पोचली. विश्वात होणारा सर्व व्यवहार, विविध देवांनी दाखविलेले पराक्रम हे या वाक्-अभृंणीमुळेच घडले, असे आत्मप्रचीतीचे बल या सुक्तात व्यक्त झालेले आहे.

श्री देवता

पुढची देवता म्हणजे श्री. आज आपण ज्या धनदेवता लक्ष्मीचे पूजन करतो, तिचे मूळ वैदिक रूप म्हणजे श्री होय. ऋग्वेदाच्या खिलसुक्तात श्री या देवतेचे एक सूक्त आहे. ही देवता ज्येष्ठा अथवा अलक्ष्मीच्या विरोधी स्वभावाची आहे. म्हणजेच दुःख, दारिद्र्य, कलह यांचे निरसन करणारी आहे. ही धन, धान्य, अश्व, रथ, गज, फल, पुष्प आदी नानाविध रूपात विराजमान असते. थोडक्यात, या विश्वात असणारे प्रत्येक गोष्टीचे मूल्य किंवा त्या गोष्टीची शोभा ही श्री या संकल्पनेत व्यक्त झाली आहे.

अशाच असुनीती, मेधा आदी देवींचे उल्लेख ऋग्वेदात आढळतात. यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या उर्वरित वेदांमध्येही यज्ञकर्म व लौकिक कर्म यांच्याशी संबंधित अनेक देवींचे उल्लेख येतात. त्यातही विशेषतः मही, भारती आणि सरस्वती या त्रिदेवींची संकल्पना पौराणिक काळातील त्रिदेवींच्या संकल्पनेकडे निर्देश करते.

आधुनिक काळातील योगी अरविंदांसारख्या द्रष्ट्या महाकवींनी याच तीन देवींमुळे आपल्याला काव्य प्रेरणा झाल्याचे म्हटले आहे. गायत्री उपासना ही मूळ वेदात जरी सविता सूर्यनारायणाची उपासना म्हणून आलेली असली तरीही उत्तरकालीन वाङ्‍मयात ती गायत्री या देवी रूपातच अधिक लोकप्रिय झाली. मानवाच्या संस्कृतीप्रमाणे मानवी समाजात असणाऱ्या दैवत संकल्पना याही जशा उत्क्रांत होत गेल्या, त्याचा आलेख आपल्याला या वैदिक व पौराणिक साहित्यातून उपलब्ध होतो.

(लेखक ः पुणे येथील वैदिक संशोधन मंडळ येथे सहायक संचालक आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com