भाजपच्या उमेदवाराबाबत दोन दिवसांत शिक्कामोर्तब | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील आज महाडिकांची भेट घेणार

कोल्हापूर : भाजपच्या उमेदवाराबाबत दोन दिवसांत शिक्कामोर्तब

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून माजी आमदार सुरेश हाळवणकर किंवा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत या दोन नावांवर चर्चा झाली. त्यात आर्थिक कुमक, मतांची बेजमी करू शकणारा या निकषावर सौ. महाडिक यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.

महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे नाव निश्‍चित आहे. श्री. पाटील यांच्यासह त्यांचे बंधू डॉ. संजय डी. पाटील, पुतणे आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह त्यांच्या विश्‍वासू सहकाऱ्यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत; पण त्यांच्या विरोधात कोण, याची उत्सुकता राजकीय क्षेत्रात आहे.

हेही वाचा: खडकवासला धरणाच्या पडलेल्या धोकादायक संरक्षक भिंतीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कट्टर भाजपवासीय म्हणून हाळवणकर यांच्या नावाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा हिरवा कंदील आहे; पण मतांची बेजमी, आर्थिक कुमक आदी निकषावर हाळवणकर किती तयारी करतील, हा प्रश्‍न बैठकीत उपस्थित झाला. विधानसभा निवडणुकीतील प्रबळ उमेदवारच बाजूला होत असेल, तर हाळवणकर यांच्या उमेदवारीला आमदार प्रकाश आवाडे यांचाही पाठिंबा असण्याची शक्यता आहे. श्री. आवाडे यांच्यात इचलकरंजीसह जयसिंगपूर, हुपरी नगरपालिकेतील मते वळवण्याची क्षमता आहे. त्याचा फायदा श्री. हाळवणकर यांना होऊ शकतो. त्यामुळेच श्री. हाळवणकर यांचेही नाव स्पर्धेत आघाडीवर आहे.

जिल्हा परिषद, जिल्हा परिषद अध्यक्ष व ‘गोकुळ’ अशा सर्वच निवडणुकीत अपराजित राहिलेल्या शौमिका यांचेही नाव आघाडीवर आहे. या नावाला सौ. महाडिक यांचे सासरे व या मतदारसंघाचे माजी आमदार महादेवराव महाडिक सहमती देतील का नाही, याविषयी शंका आहे. सौ. महाडिक उमेदवार असतील तर आर्थिक बाजू, तडजोडीच्या पातळीवर त्याही या निवडणुकीत आव्हान उभे करू शकतात. महाडिक विरुद्ध पाटील असा सामना झाल्याशिवाय या निवडणुकीत रंगत येत नाही, असाही एक सूर आहे. त्यातूनही सौ. महाडिक यांच्या नावाचा भाजप नेत्यांचा आग्रह आहे. वरवर ही निवडणूक एकतर्फी वाटत असली भाजपनेही ताकदीचा उमेदवार उतरण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

हेही वाचा: रत्नागिरी : आंबा घाट दुरुस्ती युद्धपातळीवर

चंद्रकांत पाटील आज महाडिकांची भेट घेणार

सौ. शौमिका महाडिक यांच्या उमेदवारीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या (ता. १२) सकाळी आठ वाजता माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेणार आहेत. कसबा बावडा येथील राजाराम कारखान्‍यावर बैठक होईल. विधान परिषद, लोकसभा, विधानसभेबरोबरच अलीकडेच झालेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीतील पराभवामुळे सौ. महाडिक यांना पुन्हा रिंगणात उतरायचे का, हाही निकाल उलटा गेला तर माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या लोकसभा निवडणुकीवेळी काय होणार, असे अनेक प्रश्‍न महाडिक यांच्यासमोर आहेत.

loading image
go to top