

Kolhapur District Bank
esakal
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आज जाहीर केला. गुरुवारपासून (ता. २४) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, १ नोव्हेंबरला मतदान, तर ३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच सहकारातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.
सत्ताधारी सर्वपक्षीय पॅनेल विरुद्ध भाजप अशी संभाव्य लढत रंगण्याची चिन्हे आहेत. जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी ११ सप्टेंबरला प्रसिद्ध झाली होती. विकास सेवा संस्थांसह शेती, पाणीपुरवठा, खरेदी-विक्री संघ, नागरी बँका व पतसंस्था, औद्योगिक प्रक्रिया आणि औद्योगिक मजूर संस्थांसह एकूण २ हजार ४४५ मतदारांचा समावेश आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा सहकार उपनिबंधक सुनील चव्हाण यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणूक जाहीर झाल्याने बँकेची आचारसंहिताही लागू झाली आहे. २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ५ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. ६ ते २० ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.
२१ ऑक्टोबरला चिन्हांचे वाटप होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी बँकेवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, आमदार रोहित पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे.
भाजपकडूनही स्वतंत्र पॅनेल उभे करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह भाजप नेते पॅनेलबाबत चाचपणी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.